कोल्हापूर प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील इमारतीचा पहिला मजला पुन्हा संघाच्या ताब्यात द्याव. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत जागा ताब्यात घेण्याचा आदेश तत्काळ मागे घ्यावा, यामागणीसाठी शेतकरी संघाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चामध्ये शेतकरी संघाचे अशासकीय मंडळ, सभासद, कर्मचारी, सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शेतकरी संघ प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत इमारतीचा पहिला मजला देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याचा लेखी आदेश दिला होता. यानंतर लगेचच रविवारी देवस्थान समिती व प्रशासनाकडून हि जागा ताब्यात घेण्यात आली. यानंतर सर्वच स्तरातून या आदेशाबाबत संताप व्यक्त करण्यात आला. सोमवार 26 रोजी शेतकरी संघात झालेल्या बैठकीमध्ये बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचे ठरले.
त्यानुसार बुधवारी सकाळी अशासकीय मंडळाचे सदस्य, संघाचे सभासद, कर्मचारी, सर्वपक्षीय नेते, हितचिंतक भवानी मंडप येथे एकत्र आले. साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. शेतकरी संघ चाळीस हजार सभासदांचाच, हुकुमशाही पद्धतीने आदेश काढणाऱ्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचा धिक्कार असो, चले जाव, चले जाव जिल्हाधिकारी चले जाव अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुढे करवीर नगर वाचन मंदिर, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला.
याप्रसंगी बोलताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, शेतकरी संघाची जागा बळकावण्याचा हा घाट आहे. जिल्हाधिकारी यामध्ये लोकप्रतिनिधींचा आधार असल्याचे सांगत आहेत. त्यांनी या लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करावीत, अशी मागणी करत कोल्हापूरची स्वाभिमानी जनता हुकुमशाही कदापी सहन करणार नाही, असे सांगितले.
शेतकरी संघ अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई म्हणाले, प्रशासनाने मोगलाई, हुकुमशाही पद्धतीने संघाची जागा ताब्यात घेतली आहे. संघ संपाल असे अनेक जण म्हणत आहेत. पण 40 हजार सभासदांचा हा संघ आहे. शेतकरी संघाचे अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने उभारण्यात बहूमोल योगदान आहे. त्यामुळे संघ संपला अशी समजूत कोणी करु नये. शासनाने ताब्यात घेतलेली जागा पहिला खाली करावी. आपत्तीव्यवस्थापनचा कायदा मागे घ्यावा मग चर्चेतून मार्ग काढू असे देसाई यांनी सांगितले.
चंद्रकांत यादव म्हणाले, पहिला मेन राजाराम कॉलेजच्या जागेची पाहणी झाली. यानतंर शेतकरी संघाच्या जागेत घुसखोरी केली. सहकार चळवळ मोडीत काढण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. तो मोडीत काढून जागा बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चारीमुंड्या चित करुया, असे आवाहन यादव यांनी केले. मुकंद पाटील यांनी शेतकरी संघाची जागा शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. हि जागा बळकावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संघा बैल त्यांना शिंगावर घेतल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हि. बी. पाटील यांनी सहकाराच्या मंदिरावर कोणी घाला घालत असेल तर कदापी सहन करणार नसल्याचे सांगितले. यावेळी शिवाजीराव परुळेकर, भारती पवार, अजितसिंह मोहीते आदींनीही आपले मत व्यक्त केले.
मोर्चामध्ये आमदार ऋतुराज पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख सुनील मोदी, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष आर. के. पोवार, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, दुर्वास कदम, शेतकरी संघ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिपक निंबाळकर, व्यंकप्पा भोसले, कमलाकर जगदाळे, शशीकांत पाटील, अॅङ बाबा इंदूलकर आदी उपस्थित होते.