जिल्हाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी; बैठकीत शेतकरी संघ परिवाराची वज्रमुठ; तीव्र लढा उभारण्याचा निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
शेतकरी सहकारी संघाची भवानी मंडप येथील इमारत प्रशासनाने ताब्यात घेतल्याने पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याविरोधात उद्रेक निर्माण झाला आहे. सोमवारी (25 रोजी) झालेल्या आजी-माजी पदाधिकारी व सर्वपक्षीय संघटनांच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी (27 रोजी) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाव धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या इमारतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असतानाही कुलपे तोडून ताबा घेणाऱ्या जिल्हाधिकारी रेखावार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली.
नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील इमारतीचे तीन मजले ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिले होते. त्यानुसार रविवारी जिल्हा प्रशासनाने ही इमारत ताब्यात घेतली. याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 40 हजार सभासदांच्या मालकीची ही इमारत बेकायदा ताब्यात घेतल्याचा आरोप करत सोमवारी झालेल्या संघाच्या आजी-माजी पदाधिकारी व सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री केसरकर व जिल्हाधिकारी रेखावार यांचा तीव्र निषेध करण्यात आला.
या बैठकीत सुनील मोदी यांनी कोणताही गट-तट न मानता जिह्याचा स्वाभिमान म्हणून शेतकरी संघाची ही इमारत वाचवण्याचे आवाहन केले. कुलपे तोडून जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. चोवीस तासांच्या आत त्यांची बदली करून फौजदारी दाखल करण्याची मागणीही मोदी यांनी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. या दोघांकडून जिह्यातील शाहू महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा कुटील डाव सुरू असल्याचा आरोप केला.
विजय देवणे म्हणाले, दीपक केसरकर पालकमंत्री झाल्यापासून जिह्यात असंतोष निर्माण झाला आहे. आधी सुईने टोचायचे, मग दाभण लावायचे आणि नंतर हातोडा मारायचा, अशी त्यांची कृती सुरू आहे. यावेळी आकाराम पाटील, संभाजी जगदाळे, मुकुंद पाटील, रवी जाधव, अनिल घाटगे, सुरेश देसाई व अजितसिंह मोहिते यांचीही भाषणे झाली.
कोल्हापूरात ‘महाराव‘ आहेत, लक्षात ठेवा !
कॉ. दिलीप पोवार म्हणाले, न्यायालयीन वाद सुरू असलेल्या शेतकरी संघाच्या इमारतीचा ताबा घेऊन जिल्हाधिकारी रेखावार यांनी घटनेची पायमल्ली केली आहे. तुम्ही ‘रेखावार‘ असाल, तर कोल्हापुरात ‘महाराव‘ आहेत, हे लक्षात ठेवा, असा इशारा देऊन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात ताकदीने लढण्याचे आवाहन केले.
हुजरेगिरी करणारा कामत कोण ?
पालकमंत्री केसरकर यांचा स्वीय सहायक कामत हा डायऱ्या घेऊन बसतो. जागा कोठे आहे, हे पाहून पालकमंत्र्यांना सांगतो. हुजरेगिरी कारणारा हा कोण कामत ? त्याचाही बंदोबस्त केला पाहिजे, असे देवणे म्हणाले.
राजीनामा तयार ठेवा
संभाजी जगदाळे यांनी, अशासकीय प्रशासक मंडळाने आपली नियत साफ ठेवून शासन निर्णयाविरोधात राजीनामा देण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगितले. यावर अध्यक्ष सुरेश देसाई व सदस्य अजितसिंह मोहिते यांनी, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. संघाच्या अस्मितेसाठी कोणत्याही लढाईला तयार असल्याचे सांगितले.









