शाहूवाडी प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे असलेल्या ऐतिहासिक पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विठ्ठल मंदिर जिर्णोदार समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मलकापूर शहरातील पुरोहित रवींद्र जोशी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराच्या जयघोषात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस अभिषेक करण्यात आला. तर भजन कीर्तनाने परिसर भक्तीमय होऊन गेला होता.
अधिक वाचा- प्लास्टिकचा वापर टाळू; पर्यावरण रक्षणाचा संकल्प करू- मुख्यमंत्री शिंदे
शाहुवाडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मलकापूर येथील पुरातन विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती. कोसळणाऱ्या पाऊस धारा आणि मुखामध्ये विठू नामाचा गजर करत विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा आषाढी एकादशीला भक्तीचा सागर लोटल्याने मलकापूर शहर भक्तिमय झाले होते. विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आकर्षक दिसत होते. भक्तांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. शिरगाव येथील मुकबधिर कलाकार आनंदा पोद्दार यांनी रेखाटलेली विठू माऊली ची रांगोळी सर्वांच लक्ष वेधत होती.