व्दिखंडात्मक छपाई लांबली : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेण्याची गरज
संजीव खाडे/कोल्हापूर
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन, कार्य, कर्तृत्व प्रकाश टाकणाऱ्या शाहू गौरव ग्रंथाला राज्यात साडेतीन महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा फटका बसला आहे. राज्यातील सरकार बदलल्याने या गौरव ग्रंथाची छपाई लांबणीवर पडली आहे. राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीने जरी सर्व तयारी केली असली तर नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या संदेशासाठी प्रकाशनाचे घोडे अडले आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीवेळी 1974 मध्ये पी. बी. साळुंखे यांनी शाहू गौरव ग्रंथाचे संपादन केले होते. शाहूंवरील असंख्य गंथ, पुस्तकात हा गौरव गंथ अमूल्य ठरला होता. त्यानंतर 2013 मध्ये राज्य शासनाने राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीवर शाहूकार प्रा. डॉ. रमेश जाधव सदस्य सचिव नियुक्ती केली. डॉ. जाधव यांनी आपल्या समितीतील सदस्य सहकाऱ्यांच्या मदतीने सलग तीन वर्षे काम करून शाहू गौरव ग्रंथ नव्या रुपात अतिरिक्त माहिती, लेख, छायाचित्रांसह प्रकाशित केला. 26 जून 2016 रोजी शाहू जयंतीदिवशी या गौरव गंथाचे कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्य़गृहात विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
गौरव ग्रंथाला प्रचंड प्रतिसाद, दहाहजार प्रतिंची विक्री
2016 मध्ये प्रकाशित झालेल्या शाहू गौरव ग्रंथाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. तब्बल दहा हजार प्रतींची विक्री झाली. त्यानंतर वारंवार मागणी होऊन पुनर्मुद्रण होऊ शकले नाही. आजही या गौरव ग्रंथाच्या मागणीसाठी शाहूप्रेमी वाचक शासकीय मुद्रणालयात नोंदणी करत आहेत.
मविआ सरकार काळात समिती नियुक्त
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुढे एप्रिल 2022 मध्ये राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेंची नियुक्ती झाली. तसेच इतर सदस्यही निवडण्यात आले. या समितीच्या माध्यमातून कामही सुरू झाले. समितीने शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै. रा. कृ. कणबरकर यांनी शाहू महाराजांवर इंग्रजीत लिहिलेल्या ‘ग्लिम्सेस ऑफ राजर्षी शाहू महाराज’ या पुस्तकाचे आणि एस. एस. भोसले लिखित ‘क्रांतीसूक्ते’ या पुस्तकाचे पुनःप्रकाशन केले. शाहू गौरव ग्रंथाची वाढती मागणी पाहून समितीने दोन खंडात हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारमधील त्यावेळचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतही यांनी हिरवा कंदील दर्शविला. पण जूनमध्ये राज्यातील ठाकरे सरकार गडगडले. सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. सत्तांतराला साडेतीन महिन्यांचा कालवधी लोटला. या काळात नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे संदेश अद्याप मिळालेले नाहीत, त्यामुळे गौरव ग्रंथाचे मुद्रण लांबणीवर पडले आहे. या प्रकारात आता कोल्हापूरचे सुपुत्र व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीं चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालून शाहू गौरव गंथ लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी आपली ताकद वापरावी, अशी मागणी शाहूप्रेमी वाचकांतून होत आहे.
शाहू गौरव ग्रंथ प्रकाशनासंदर्भात समितीची येत्या पंधरा दिवसांत बैठक आहे. त्यानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर बैठक होईल. छपाईची तयारी पूर्ण आहे. तीन महिन्यात शाहू गौरव ग्रंथ शाहूप्रेमी वाचकांना दोन खंडांच्या रूपात उपलब्ध होईल. – विजय चोरमारे, सदस्य सचिव, राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती