दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव नगरविकास विभागाकडून पुढे सरकेना : पंचगंगा प्रदूषणमुक्त कशी होणार
विनोद सावंत कोल्हापूर
केंद्र शासनाकडून अमृत योजना टप्पा दोन अंतर्गत कोल्हापूर महापालिकेला 346 कोटींच्या निधीला मंजूरी मिळून वर्ष होत आले तरी निधी काही मिळालेला नाही. मनपाने केलेल्या ‘डीपीआर’ला महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाची तांत्रिक मंजूरी मिळाली आहे. मात्र, नगरविकास विकास विभागाकडून प्रशासकीय मान्यतेची फाईल सहा महिने झाले तरी पुढे सरकलेली नाही.
कोल्हापूर महापालिकेला केंद्र आणि राज्यशासनाकडून अमृत योजनेतून भरीव निधी मिळत आहे. यामुळेच पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी हातभार लागत आहे. अमृत योजनेतून ड्रेनेजलाईन, पिण्याची पाईपलाईन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहे. अमृत योजना 1 मधून शहराला 115 कोटींचा निधी पिण्याच्या पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाक्यांसाठी तर 80 कोटींचा निधी ड्रेनेजलाईन, एसटीपीसाठी मिळाला असून कामही सुरू झाले आहे. अमृत 1 मधून शहराची संपूर्ण ड्रेनेजलाईन कव्हर होत नव्हती. तसेच 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. 10 टक्के सांडपाणी प्रक्रियाविना पंचगंगेत जात आहे. त्यामुळे अमृत योजना टप्पा 2 मध्ये कोल्हापूर महापालिकेने उर्वरीत कामांसाठी निधीचा मागणी केली होती. केंद्र शासनाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी 346 कोटींच्या निधीला मंजूर दिली. यामध्ये 4 नाल्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. परंतू वर्ष होत आले तरी निधी काही मिळालेला नाही. यासंदर्भातील प्रस्ताव शासकीय कार्यालयाच्या फेऱ्यामध्ये अडकला आहे.
मग पंचगंगा प्रदूषण मुक्त केव्हा होणार?
केंद्र शासनाच्या अमृत योजना टप्पा दोनमधून शहरातील 300 हून अधिक किलोमीटरची ड्रेनेजलाईन आणि 3 नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येणार आहे. वेळीच निधी मिळणे आवश्यक आहे. निधी मिळाल्यानंतर कामे पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन वर्ष लागणार आहेत. मंजूरीमध्येच वर्ष गेले तर कामे कधी होणार आणि 100 टक्के पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात 536 किलोमीटरची ड्रेनेजलाईन
अमृत योजना 1 मध्ये 286 किलोमीटरची ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यावर आहे. अमृत योजना टप्पा दोनमधून 250 किलोमीटरची ड्रेनेजलाईन नव्याने टाकली जाणार आहे. तर 90 किलोमीटर जुन ड्रेनेजलाईन बदलली जाणार आहे.
नगरविकासकडे 5 पैकी 4 प्रस्ताव अडकले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजूरी मिळालेले 5 कामापैकी 4 कामांचे प्रस्ताव नगरविकास विभागाच्या राज्य समितीकडून तांत्रिक मंजूरीसाठी पाठविले आहेत. त्यांच्या मंजूरीनंतरच महापालिकेकडे निधी वर्ग होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती मनपातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमृत योजना 2 मधून हाणारी कामे
एसटीपी क्षमता
जयंती नाला 7 एमएलडी
दुधाळी नाला 16 एमएलडी
बापट कॅम्प 12 एमएलडी
अमृत टप्पा दोनमधून मंजूर निधी
दुधाळी नाला -57 कोटी
जयंती नाला-51 कोटी
लाईनबाजार नाला 32 कोटी
रंकाळा तलाव-4 कोटी 65 लाख
लक्षतीर्थ वसाहत तलाव-11 कोटी 99 लाख
योजनेवरील निधीचा हिस्सा
महापालिका -30 टक्के
राज्य शासन -33.33 टक्के
केंद्र शासन -36.67









