सरवडे प्रतिनिधी
निपाणी – फोंडा राज्यमार्गावर सरवडे येथील दूधगंगा नदी पुलाजवळ मोटरसायकल चालवणाऱ्या रितेश अमरसिंह पाटील ( वय २१) या युवकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात रितेश गंभीर जखमी झाला होता.उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील यांचा पुतण्या तर माजी उपसरपंच अमरसिंह पाटील यांचा मुलगा होत. दसरा सणासाठी गावी आलेल्या रितेशचा असा अपघाती मृत्यू झाल्याने सरवडेसह परिसरात शोककळा पसरली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रितेश पाटील रात्री उशिरा सरवडेकडे येत असताना दूधगंगा नदीपुलावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. त्याच्या मागे मोठा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाचा असल्याने गावात त्याचा मोठा मित्र वर्ग होता. एैन दसऱ्याच्या सुमारास अशी दुदैवी घटना घडल्याने परिसरात पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज दुपारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतयात्रेत बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक राजेंद्र मोरे, आर. वाय. पाटील, बिद्रीचे संचालक युवराज वारके, भिकाजी एकल, एस. पी. पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी होते.









