गव्हर्नर फ्रीअर यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचे कौतुक केले आहे
By : मानसिंगराव कुमठेकर
सांगली : कोल्हापूर संस्थांनच्या इतिहासात छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांची कारकीर्द महत्त्वाची आहे. 4 ऑगस्ट 1866 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे निधन झाले. त्यांनी राजाराम महाराज यांना दत्तक घेतले होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 18 ऑगस्ट 1866 रोजी राजाराम महाराज दुसरे हे करवीरच्या गादीवर आले.
दरबारासाठी ससंस्थानिकांची उपस्थिती
त्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ तत्कालीन गव्हर्नर सर हेन्री बार्टल फ्रीअर यांनी पुणे येथे 29 ऑक्टोबर 1866 रोजी मोठा दरबार भरवला. यावेळी दक्षिण महाराष्ट्रातील सर्व संस्थानिकांची व अन्य सरदारांची उपस्थिती होती. या दरबारचा तत्कालीन अहवाल मिळाला आहे. त्यावरून कोल्हापूर छत्रपतींना दिला जाणारा मान–मरातब, त्यांचे राजमंडळात असलेले स्थान याची माहिती मिळते.
सरदारांची मांदियाळी हजर
जव्हारचे राजेसाहेब, चिमणाजी रघुनाथ पंतसचिव भोरकर, मुधोजीराव नाईक निंबाळकर फलटण, अमृतराव रामराव डफळे, जत, अब्दुल खैरखान नवाब सावनूरकर, व्यंकटराव घोरपडे मुधोळकर, धुंडीराज तात्यासाहेब सांगलीकर, गणपतराव तात्यासाहेब मिरजकर, लक्ष्मणराव अण्णासाहेब मिरजकर, रामचंद्रराव आप्पासाहेब जमखंडीकर, रघुनाथराव दादासाहेब कुरुंदवाडकर, रामराव रावसाहेब भावे रामदुर्गकर, राजे रतनसिंग जाधवराव माळेगावकर, माधवराव बल्लाळ फडणीस मेणवलीकर, माधवराव विठ्ठल विंचुरकर यांसह अन्य सरदारही उपस्थित होते.
गव्हर्नरकडून कौतुक वर्षाव
गव्हर्नर फ्रीअर यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचे कौतुक केले आहे. ते म्हणतात, महाराजांची स्वारी पुण्यात आल्याने आम्हास फार संतोष झाला व मरहून महाराजसाहेब यास देवाज्ञा झाल्याचे वर्तमान ऐकून सरकारास जे अतिशय दु:ख झाले होते, त्याचा पुष्कळ अंशी परिहार झाला.
महाराज, आपण महाराष्ट्र देशाच्या इतिहासामध्ये अतिविख्यात कुळातील मुख्य असून महाराजांच्या अंमलाखाली पुष्कळ चांगले प्रांत व लक्षावधी लोक आहेत. महाराज राज्यकारभार जसा चालवतील त्याप्रमाणे त्या लोकास सुख होणार आहे. सबब महाराजांवर लहानपणीच मोठ्या जोखमीचे काम पडले आहे. ते सिद्धीस नेण्यास महाराजास सामर्थ्य व सुबुद्धी द्यावी, अशी ईश्वराजवळ मन:पूर्वक प्रार्थना आहे, असे म्हटलं आहे.
गव्हर्नरकडून पोषाख
मरहूम महाराजांनी उत्तम प्रकारची व्यवस्था ठेवली होती ती तशीच चालू आहे. महाराजांची स्वारी जेथे जाईल, तेथे इंग्रज सरकारचा आश्रय आहे. काश्मीरापासून सिंहलीद्विपापर्यंत जावे, असे मनात आले तर शिपाई प्यादे बरोबर घेणे नको. कोणी मनुष्याने हरकत केली, तर त्यास इंग्रज सरकारातून शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
महाराजांचे मनात आल्यास युरोप खंडाचे किंवा अमेरिका खंडाचे सुधारलेले देशातसुद्धा महाराजांना जाता येईल. जेथे महाराज जातील तेथे एखाद्या राजाप्रमाणे महाराजांचा आदर व सत्कार सर्व प्रकारे केला जाईल. यानंतर गव्हर्नर साहेबांनी छत्रपती राजाराम महाराज यांना पोशाख दिला आणि 17 तोफांची सलामी झाली.
यानंतर राजाराम महाराज यांनी सत्काराला उत्तर दिलेले भाषणही उपलब्ध आहे. स्वर्गीय महाराजांच्या लौकिकाला साजेसे वर्तन आपण करू आणि शिवाजी महाराजांचे पुरातन खानदानाचा मोठेपणा व कल्याण ज्यामध्ये आहे, त्या प्रकारे वागू असे छत्रपती राजाराम महाराजांनी या भाषणामध्ये सांगितले.
पुढे राजाराम महाराज हे इटली येथे गेले. परदेशात जाणारे ते या घराण्यातील पहिले राजे होते. तेथेच त्यांचा 30 नोव्हेंबर 1866 रोजी मृत्यू झाला. त्यांचे तेथे स्मारक आहे.
गव्हर्नरच्या तोडीचा छत्रपतींना सन्मान
या दरबारावेळी छत्रपती महाराज उपस्थित झाले, तेव्हा मुंबईचे पॉलिटिकल सेक्रेटरी आणि कोल्हापूर व कर्नाटक प्रांताचे पॉलिटिकल एजंट यांनी त्यांना सामोरे जात मुख्य उच्चासनावर बसवले. कोल्हापूर छत्रपती यांची खुर्ची ही गव्हर्नर साहेबांच्या खुर्चीबरोबर उच्चस्थानी होती.
महाराजांजवळ रामराव नरसिंह ताडपत्रे, नारायणराव घाटगे सर्जेराव, त्यांचे पुत्र दत्ताजीराव आबासाहेब, श्रीनिवास पंडित उर्फ रावजी महाराज, कृष्णराव भाऊसाहेब पंतप्रतिनिधी विशाळगडकर, मोरेश्वर बाबासाहेब पंतअमात्य बावडेकर, संताजीराव घोरपडे, सेनापती कापशीकर, गोविंदराव आबासाहेब घोरपडे इचलकरंजीकर, सुभानरावसाहेब सेना खासखेल तोरगलकर, गोपाळराव साहेब सरलस्कर बहादुर, नारायणराव घोरपडे अमीरूल उमराव दत्तवाडकर उपस्थित होते.









