सांगरूळ / वार्ताहर
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिक संजय पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. यातून संजय पवार यांच्याप्रती सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये असलेली आपुलकीचा धागा किती घट्ट आहे याची जाणीव होते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव जाहीर करताच सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून उत्साहाला उधाण आले होते. महाविकास आघाडीकडे संख्याबळ असल्याने व महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींनी संजय पवार यांच्या विजयाची खात्री दिल्याने संजय पवार यांच्या विजयाची औपचारिकता फक्त बाकी राहिली आहे अशी भावना शिवसैनिकांच्या मनात निर्माण झाली होती. पण राज्यसभेच्या निकाल लागला आणि भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. संजय पवारांचा अनपेक्षितरित्या झालेला पराभव सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात चांगलाच घर करून बसला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असोत अगर कोणत्याही निवडणुका असोत पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून सातत्याने पक्षकार्य करण्यात व्यस्त असणारा एक रांगडा कार्यकर्ता म्हणून संजय पवार यांची जिल्हाभर ओळख आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील प्रशांत नाळे मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत. एक रांगडा व पक्षाशी एकनिष्ठ असणारा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे सध्या ते करवीर तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आपला नेता खासदार होणार या आतुरतेने निकालाची प्रतिक्षा करत असलेल्या प्रशांतचा निकालानंतर अपेक्षाभंग झाला. प्रशांत नाळे हे संजय पवार यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले आसता, ते आपल्या भावना लपवू शकले नाहीत. संजय पवार यांना मिठी मारत त्यांनी आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली. कार्यकर्त्यांच्या प्रेमामूळे संजय पवारही अश्रू लपवू शकले नाहीत. नेता व कार्यकर्ता यांनी एकमेकास मिठी मारत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सच्चा शिवसैनिकाचा पक्षाच्या नेत्या विषयी असलेल्या भावनांचे दर्शन यातून उपस्थितांना घडले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांचे मन हेलावून गेले.