पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नेते, उपनेत्यांच्या निवडी जाहीर
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेनेने (ठाकरे गट) राज्यात पक्षवाढीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्याचा एक भाग म्हणून पक्षाच्या कार्याकारिणीचाही विस्तार केला आहे. रविवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सहा नवे नेते, उपनेते आणि संघटकपदासह इतर पदावरील पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांची उपनेतेपदावर नियुक्ती केली आहे. कोल्हापूरला प्रथमच शिवसेनेने पवार यांच्या रूपाने राज्यस्तरावर पद दिल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शिवसेना आणि ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ नेता म्हणून ओळख असलेल्या संजय पवार यांनी 1989 पासून शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांनी करवीर तालुका प्रमुखपद भूषविले. 1990 मध्ये ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले. 1995 मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. त्या सभागृहात त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी पार पाडत सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला. 2005 मध्ये तिसऱ्यांदा महापालिकेवर निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. विशेष म्हणजे ते तिन्हीवेळा तीन स्वतंत्र प्रभागातून विजयी झाले होते. 2005 मध्ये त्यांनी कोल्हापूर शहर प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली. गेली पंधराहून अधिक वर्षे ते जिल्हा प्रमुखपदावर कार्यरत आहेत. या काळात त्यांनी शहरवासीयांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक आंदोलने केली. अन्याय अत्याचाराविरोधात लढणारा नेता म्हणून पवार यांची प्रतिमा आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्षपद (राज्यमंत्री दर्जा) दोन वर्षे सांभाळताना पवार यांनी मराठा समाजातील युवकांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देण्यातही मोलाचे सहकार्य केले होते. गतवर्षी 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत तत्कालिन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांना उमेदवारी दिली होती.
संजय पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
दरम्यान, उपनेतेपदी निवड झाल्याचे समजल्यानंतर संजय पवार यांच्या नागाळापार्क आरटीओ ऑफिस परिसरातील निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी अभिनंदनासाठी गर्दी केली. सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, कमलाकर जगदाळे, युवा सेनेचे मनजित माने, माजी नगरसेवक नियाज खान आदींसह इतर मान्यवरांनी पवार यांचे अभिनंदन केले.
जिल्हाप्रमुखपद सांभाळत असताना पक्ष प्रमुख उद्धवसाहेबांनी विश्वासाने उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. पक्षवाढीसाठी या पदाचा वापर केला जाईल. आगामी सर्व निवडणुकात पक्षाचे जास्तीत जास्तीत उमेदवार ज्ंिाकून आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील.
-संजय पवार, शिवसेना उपनेते.
शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी असे :
नेते मंडळ : मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव.
नवीन नियुक्त नेते : विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू.
उपनेते : संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई) विजय (खंड्या) साळवी (कल्याण), संजय (बंडू) जाधव (परभणी), शीतल देवरुखकर (मुंबई), शरद कोळी (सोलापूर).
सचिव : वरुण सरदेसाई, सुप्रदा फातर्पेकर, साईनाथ दुर्गे.
संघटक : अस्मिता गायकवाड (सोलापूर), शुभांगी पाटील (नाशिक), जान्हवी सावंत (कोकण), छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रूपवते (मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर).








