अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यालयाला ठोकले टाळे; मीटर रिडींग प्रमाणे बिले दुरुस्त करण्याची मागणी
सांगरुळ / वार्ताहर
महावितरणच्या करवीर तालुक्यातील खाटांगळे फिडरवरील सर्व शेती पंपाच्या बिलाची आकारणी ही मिटर रिडिंगप्रमाणे न करता अश्वशक्ती (एच पी) नुसार होत आहे. यामुळे कृषीपंप धारकांनी प्रत्यक्ष वापरलेल्या युनिट पेक्षा फिडर वरील रीडिंग नुसार शेतकऱ्यांना भरमसाठ बीले दिली आहेत. सध्या मार्च एंडिंग मुळे महावितरणने वसुलीसाठी तगादा लावल्याने आज सांगरूळ येथील शेतकऱ्यांनी महावितरणवर मोर्चा काढत कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांना धारेवर धरत वाढीव वीज बिलाची महावितरण कार्यालयासमोर होळी करून आपला संताप व्यक्त केला. वाढीव वीज बिलाचा प्रश्न वरिष्ठांचा असेल तर त्यांना येथे आणा अन्यथा तुम्ही त्यांच्याकडे जा आसे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढत कार्यालयाला टाळे ठोकले.
महावितरण कंपनीतील कोल्हापूर ग्रामीण १ विभागातील फुलेवाडी उपविभागातील सांगरुळ शाखा अंतर्गत खाटांगळे फिडरवर सांगरूळ- खाटांगळे पासार्डे आमशी या गावांचा समावेश आहे. या गावातीलच शेतकऱ्यांनाही अन्यायकारक बिलाची आकारणी केली जाते .त्यामुळे संतप्त झालेल्या खाटांगळे फिडरवर असणाऱ्या शेती पंप धारकांनी आज सांगरुळ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून वीज बिलाची होळी केली.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांना धारेवर धरले.
यावेळी शेतकरी उत्तम कासोटे म्हणाले वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अगोदरच मेटाकोटीस आला आहे . यातच महावितरणचा अजब कारभार सुरू असुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वेगळे वीज मिटर असताना महावितरणने प्रत्येक फिडरवरती काॅमन मिटर बसवले असुन या मिटरचे रिडिंग घेऊन ते सर्व शेतकऱ्यांच्या अश्वशक्ती प्रमाणे विभागून दिले जाते . हा सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आन्याय आहे. मीटर रीडिंग प्रमाणे वीज बिल वसुली न करता अश्वशक्ती प्रमाणे करून महावितरण कंपनी शेतकऱ्यांसह सरकारची मोठी फसवणूक करत असल्याचे सांगितले. हा अन्याय शेतकरी कदापी करणार नाही असल्याचे ठणकावून सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुनील कापडे म्हणाले आपल्या कृषी प्रधान देशात महावितरण कंपनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत आहे . याचा दाखला देताना तीन अश्वशक्ति मोटर असणाऱ्या शेतकऱ्याला ही दहा अश्वशक्तीची बील आकारणी करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी सर्व शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांना धारेवर धरले असता त्यांनी हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरचा असल्याचे सांगितले .शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवून अशी ग्वाही दिली . तरीही संतप्त शेतकऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह तुम्ही ही वरिष्ठ कार्यालयात जा असे सांगत कार्यालयाला टाळे ठोकत कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयात धाडले. यावेळी उत्तम कासोटे, सुनिल कापडे सर्जेराव पाटील शत्रुघ्न खाडे , विलास खाडे , मधुकर पोवार, एकनाथ चाबूक , प्रकाश सासने अर्जुना नाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.