शहरासह उपनगरात कडकडीत बंद : अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच घटकांचा स्वयंस्फुर्तीने सहभाग; प्रमुख मार्गावरुन रॅली काढत जालना घटनेचा निषेध
कोल्हापूर प्रतिनिधी
जालना येथे सकल मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला कोल्हापूरकरांनी मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाले, शाळा, महाविद्यालये, वाहतूकदार अशा सर्वच घटकांनी बंदमध्ये स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला. सकल मराठा समाजाने शहरातील प्रमुख मार्गावरुन दुचाकी रॅली काढत जालना लाठीमाराचा निषेध केला. त्यानंतर दसरा चौक येथे समाज बांधवांनी मराठा आरक्षणासह संतप्त भावना व्यक्त केल्या.
या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने यावेळी केली. बंदला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वच व्यवहार बंद ठेवले. मराठा आरक्षणासाठी जालना येथे शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. याचे संतप्त पडसाद राज्यभर उमटले. कोल्हापूरमध्येही सकल मराठा समजाने या घटनेचा निषेध करत मंगळवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
शाळा महाविद्यालयांना सुट्टी
बंदच्या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या शाळांसह सर्व खासगी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली होती. याबाबत सोमवारीच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रशासनाने सुचना दिल्या होत्या. त्यामुळे शालेय परिसरात शांतता होती.
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, पानलाईन, चप्पल लाईन, छत्रपती शिवाजी मार्केट, कपिलतिर्थ मार्केट, पाडळकर मार्केट, फुलबाजार, मिरजकर तिकटी, बाजार गेट, परिसरातील सर्वच व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, भाजी विक्रेते, फळविक्रेत्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. गजबजलेल्या लक्ष्मीपुरी बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता. धान्य व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.
केएमटी बंद
बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्वच मार्गावरील केएमटी फेऱ्या रद्द केल्या होत्या. सकाळच्या सत्रात एकही केएमटी धावली नाही. त्यामुळे वर्कशॉपमध्ये केएमटी थांबून होत्या. सकाळी नोकरीनिमित्त बाहेर पडलेल्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट
प्रवाशांनी गजबजणारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गावरील एसटी फेऱ्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ कमी होती. बाहेरून आलेल्या प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा पर्याय अवलंबला.
गुजरीत शांतता
बंदला पाठींबा देत गुजरीतील सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. गुजरीतील व्यवहार ठप्प असल्याने शांतता होती.









