ओबीसीसाठी 20, सर्वसाधारणसाठी 23, सर्वसाधारण महिलांसाठी 22 गट आरक्षित अनुसूचित जातीसाठी 10 तर जमातीसाठी 1 गट आरक्षित
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकींसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. नवीन प्रभाग रचनेनुसार तयार झालेल्या 76 गटांसाठी हे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये 23 गट सर्वसाधारण झाले असून 22 गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी 20 गट आरक्षित झाले आहेत. यामधील 10 गटात महिलांना संधी मिळणार आहे. तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 10 गटातील 5 गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली हा एक गट अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित झाला आहे. 29 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत आरक्षण प्रक्रियेवर हरकती नोंदवता येणार आहेत.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार (निवडणूक) अर्चना कापसे, नायब तहसिलदार संजय वळवी यांनी ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.
जिल्हा परिषद प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होवून गट निश्चित झाल्यानंतर इच्छूकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकारी रेखावार यांनी सोडत काढून आरक्षित गटांची माहिती दिली. तसेच उपस्थितांकडून सोडत प्रक्रियेबाबत विचारलेल्या शंकाचे त्यांनी निरसन केले. निवडणूक विभागाच्या तहसिलदार अर्चना कापसे यांनी सोडत काढण्याच्या पद्धतीबाबत उपस्थितांना माहिती सांगितली. न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गासह आरक्षण काढण्यात आले. यामध्ये काही मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक इच्छूकांनी नाराजी व्यक्त केली. सोडतीच्या ठिकाणी माजी सदस्यांसह इच्छूकांनी मोठी गर्दी केली होती.
सुरवातीस अनुसूचीत जातीसाठी 10 जागांचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये 5 जागा महिलांसाठी आरक्षित केल्या. अनुसूचीत जमातीसाठी एका जागेचे आरक्षण काढण्यात आले. ओबीसी प्रवर्गासाठी शाळकरी मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ पद्धतीने 20 गटांचे आरक्षण काढले. यामध्ये निवडणुक आयोगाच्या सूचनांप्रमाणे 2002, 2007, 2012,2017 मधील निवडणुकातील आरक्षणाचा विचार करून आरक्षण निश्चित केले. 20 ओबीसी जागांपैकी महिलांसाठी 10 गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उर्वरीत 45 गटांमध्ये 23 सर्वसाधारण तर 22 गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केले.
अनूसूचीत जमातीसाठी मगदूम यांची हरकत
पट्टणकोडोली मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षण पडल्याने माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी आरक्षण सोडती दरम्यान हरकत नोंदवली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसून यापूर्वी देखील जिह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जमातीचे आरक्षण पडले होते. त्या ठिकाणच्या जागा रिक्त राहिल्या होत्या असे नमूद करून मगदूम यांनी या आरक्षणाबाबत हरकत नोंदवली.
जातीचे दाखले काढण्यासाठी उडणार झुंबड
जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या माजी सदस्यांचे गट ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांनी आता कुणबीचा दाखला काढण्याची तयारी सुरु केली आहे. बारा पंचायत समितीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छूकांकडूनही हाच कित्ता गिरवला जाणार आहे. त्याचबरोबरच आरक्षित प्रवर्गातील इच्छूकांनाही जात प्रमाणपत्राची गरज असल्यामुळे आता जातीचे दाखले काढण्यासाठी झुंबड उडणार आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरु
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे जिह्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूकीची तारीख निश्चित झाली नसली तरी आरक्षण समजल्यामुळे इच्छूकांकडून मतदारसंघ पिंजून काढले जाणार आहेत.