राशिवडे वार्ताहर
दहा वर्षानंतर भरलेल्या येथील शुक्रवारच्या जनावरांच्या आठवडा बाजारामध्ये सकाळी चार तासातच सुमारे 70 लाखाची उलाढाल झाली. यामध्ये म्हैशींचा मोठ्या प्रमाणात विक्री व्यवहार झाला. ग्रामपंचायतीच्या वतीने जनावरांना मोफत चारा तर जनावरे मालकांना नाष्ट्याची सोय केली होती. दुपारी १२ वाजताच जनावरांचा बाजार संपला.
गेल्या दहा वर्षांपासून राशिवडेतील दर शुक्रवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद झाला होता. जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा हा बाजार नव्याने सुरू करण्यासाठी सरपंच सौ. संजीवनी पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, ग्रा.पं.सदस्य सर्जेराव गोंगाणे, गणपती चौगले, आनंदराव चौगले, नंदु पाटील, डाँ.जयसिंग पाटील, डाँ.प्रकाश पोवार जिल्ह्यातील आठवडा बाजारमध्ये फिरून व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळपासूनच म्हैशींचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला. चार तासातच सत्तर लाखाची उलाढाल झाली. या बाजारात म्हैशींचाच व्यवहार मोठ्या प्रमाणात झाला.
यावेळी ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. खरेदी, विक्रीसाठी आलेल्या नागरिकांची चहा, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. इथूनपुढे दर शुक्रवारी नामानंद चौकात हा जनावरांचा बाजार भरला जाणार आहे. त्यामुळे सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या बाजारपेठेला भेट द्यावी.