पोलिसांच्या कारवाईची गरज, दहशत मोडून काढण्याचे आव्हान
आशिष आडिवरेकर/कोल्हापूर
हाणामारी वर्चस्वादाची जिवघेणी चढाओढ… खून का बदला खून…दिवसाढवळ्या नंग्या तलवारीचा नाच….भरचौकात वाढदिवस…वाढदिवसाचे होर्डिंग यातून अशांत असणारा रंकाळा टॉवर यापूर्वी जिह्याने अनेकदा अनुभवला आहे. टॉवरवरील वर्चस्व वादातून दोन खून तर अनेक हाफ मर्डर झाले आहेत. गेल्या काही वर्षापासून शांत असणारा टॉवर पुन्हा धुमसू लागला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या घटनेने 20 वर्षापूर्वीच्या टोळी युद्धाला पुन्हा उजाळा मिळाला असून पोलिसांनी वेळीच याला पायबंद घालणे गरजेचे आहे.
रंकाळा टॉवर आणि परिसरात काही वर्षापूर्वी वर्चस्व वादातून खून, हाणामरी प्रकार घडले होते. यामधून रंकाळा टॉवर येथील अनेक कुटुंबांची वाताहत झाली होती. येथील प्रमुख टोळ्यांचे म्होरके राजकारणात शिरल्याने कार्यकर्त्यांचे बळही वाढू लागले. यातून रंकाळा टॉवर परिसरात यु. के बॉईज, क्रांती बॉईज, पी. एम. बॉईज अशी बडी मंडळे स्थापन झाली. यामुळे या वादात अधिकच भर पडत गेली. यातून पिंटू लोहार याचा खून आणि त्यानंतर धुमसत राहिलेला टॉवर जिह्याने अनेक वर्षे अनुभवला. मात्र म्होरके राजकारणात गेल्याने कार्यकर्ते मात्र पोलिसांच्या रडारावर राहिले. गेल्या काही वर्षापासून रंकाळा टॉवर परिसरात कांदेकर, लिमकर, लोहार, मोरस्कर, मिसाळ या गँगची दहशत आहे. या पाच गँगमध्ये नेहमीच वाद होत होते. सुरुवातीच्या काळात कांदेकर व लिमकर गट एकत्र होता. मात्र नंतर या दोघांमध्येही वाद होऊन नवीन टोळी युद्ध झाले. गेल्या काही वर्षापासून पोलिसांनी ही दहशत मोडून काढली होती. आता मात्र पुन्हा ही दहशत डोके वर काढत आहे.
पोलीस यंत्रणा निवडणूक, बंदोबस्त
गेल्या काही दिवसांपासून पोलीस यंत्रणेवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच पोट निवडणूक, जोतिबा यात्रा, मोर्चा, आणि प्रचारसभेचे नियोजन यामध्ये व्यस्थ आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेचे सध्या दुर्लक्ष झाले आहे. याचाच फायदा काही फाळकुट दादा घेत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणा पुन्हा अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे.
महापालिका निवडणुकीचा संदर्भ
रंकाळा टॉवर सुरु असलेल्या वर्चस्ववादाला आगामी महापालिका निवडणुकीची किनार आहे. गेल्या काही वर्षापासून येथील वाद, हाणामाऱया शांत होत्या, मात्र आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्चस्ववादाने पुन्हा डोके वर काढले आहे. आगामी निवडणुकीत येथील टोळीचा बॅकअप मिळवण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
लेटरवर कारवाई केली असती तर…
नोव्हेंबर 2021 मध्ये रंकाळा टाॉवर, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, शिवाजी पेठ परिसरातील घरांमध्ये एक दोन पानी लेटर टाकण्यात आले होते. यामध्ये 25 वर्षापूर्वी जशी रॅली निघाली तशी रॅली काढायची आहे. यु. के. नाव मोठे करायचे आहे. यासोबतच काही चिथावणीखोर संदेश देणारा मजकूर या लेटरवर होता. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचवेळी जुना राजवाडा पोलिसांनी संबंधित लेटर टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली असती तर सोमवारी रात्री घडलेला प्रकार घडला नसता अशी चर्चा परिसरातील नागरीकांच्यात रंगली होती.
तडीपार हद्दीतच
शहरासह जिह्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस यंत्रणेने मोका, तडीपारीच्या कारवायांचे अस्त्र बाहेर काढले. गेल्या वर्षभरात अनेक नामचिन आणि कुख्यात गुंडाना पोलिसांनी तडीपार केले आहे. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेक गुंड आपल्या हद्दीतच अंडर ग्राउंड राहून कारभार करत आहेत.
टॉवरवरील खाद्यपदार्थाच्या गाड्य़ांवरही दहशत
रंकाळा परिसरात असणाऱया खाद्यपदार्थ्याच्या व्यावसायीकांनाही येथील स्थानिक टोळ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही फाळकुट दादा फुकट खाणे, खंडणी, हफ्ता वसुल करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. मात्र येथील व्यावसायिक बुक्यांचा मार सहन करत आहेत. पोलिसांनी या ठिकाणी एखादी कोपरा सभा घेऊन येथील व्यावसायिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी आपल्या हस्तकांनाचा गाडय़ा लावून देण्यासाठीही येथील स्थानिक टोळ्यांमध्ये कायम वाद होत असतो.
दहशतीविरोधात तक्रारी देण्यास निर्भयपणे पुढे या
सोमवारी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस टाण्यात संबंधीतांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. परिसरातील सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरीकांनी परिसरातील दहशतीविरोधात तक्रारी देण्यास निर्भयपणे पुढे यावे, त्यांचे नांव गोपनीय ठेवले जाईल. संबंधीत टोळ्यांवर कडक कारवाई करण्याचे काम सुरु आहे.
शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण