Man ki Baat Maju More Kolhapur News : देव देवतांचे जीर्ण झालेले व त्यानंतर उघड्यावर टाकून दिलेले फोटो गोळा करून त्याचे योग्य पद्धतीने निर्गत करण्याचा उपक्रम राबवणाऱ्या येथील राजू मोरे यांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमासाठी दिल्लीहून आलेल्या पथकाने या उपक्रमाचे चित्रीकरण केले. माहिती घेतली. देशात सामाजिक,पर्यावरण, स्वच्छता, शेती, विज्ञान अशा विविध क्षेत्रात वेगळी कामगिरी करणाऱ्या साध्या साध्या माणसांची नोंद मन की बात या कार्यक्रमात वेगळे उदाहरण म्हणून घेतली जाते. आज फुलेवाडी येथे राजू मोरे यांच्या निवासस्थानासमोर घातलेल्या मंडपात मोरे यांच्या असंख्य स्नेह परिवाराने हा कार्यक्रम पाहिला.
अनेकांच्या घरात देवदेवतांचे फोटो असतात. ते जीर्ण झाल्यावर झाडाखाली टाकले जातात. देव देवतांची अशी होणारी विटंबना राजू मोरे व त्यांच्या ऋग्वेदा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यात वेदना पोहोचवत होती.त्यामुळे त्यांनी असे फोटो स्वखर्चाने गोळा करणे सुरू केले. हे फोटो खोलून त्यांनी देव देवतांच्या चित्रांचा लगदा तयार केला. व त्यापासून नवीन कागदी मुर्त्या करण्यासाठी तो लगदा मूर्तीकरांना दिला.फोटोवरील काचा प्रेम व्यवसायिकांना दिल्या. सुमारे एक ट्रक भर फोटो राजू मोरे यांनी गोळा केले. या उपक्रमाची सुरवातीला चेष्टाही झाली.पण नंतर या उपक्रमाचे महत्त्व लोकांच्या लक्षात आल्याने लोकांनीही त्यांना सहकार्य केले.व या उपक्रमाचे रूपांतर चळवळीत झाले.
या कार्याची दखल राज्यभर घेतली गेली.पंतप्रधान कार्यालयानेही त्याची नोंद घेतली.त्यामुळे काल सकाळी मोरे यांना मन की बात या कार्यक्रमांमध्ये आज या उपक्रमाची दखल घेतली जाणार असल्याचा निरोप देण्यात आला. त्यानंतर हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी मोरे यांनी मंडपच उभा केला.मोठ्या टीव्ही क्रीनची सोय केली.भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक,राहुल चिकोडे,महेश जाधव ,अशोक देसाई यांच्यासह सर्व पदाधिकारी,राजू मोरे यांचा स्नेह परिवार अशा सर्वांनी हा कार्यक्रम पाहिला.

आपला हा उपक्रम संवेदनशील मनाच्या एका कप्प्यातून सुरू झाला. तो करताना त्याची नोंद पंतप्रधान कार्यालय घेईल अशी काही अपेक्षा नव्हती. पण आज याची नोंद घेतल्याने आम्हाला आणखी बळ आल्याची प्रतिक्रिया राजीव मोरे यांनी व्यक्त केली.
सर्वप्रथम दखल तरण भारत संवादने….
राजू मोरे यांच्या या उपक्रमाची नोंद दैनिक तरुण भारत संवादने सर्वप्रथम घेतली होती. त्यांचा उपक्रम प्रसिद्धीसाठी नक्कीच नव्हता. पण त्यांचे काम तरुण भारत मुळे सर्वत्र पोहोचले व त्यांच्या उपक्रमात अनेक जण स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. व त्याला लोक सहभागाचे स्वरूप आले.









