म्हासुर्ली, वार्ताहर
Kolhapur Rain Update : गेल्या दोन दिवसापासून धामणी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने धामणी नदीला पूर आला आहे. परिणामी धामणी नदीवरील चार बंधाऱ्यासह कुंभी नदीवरील गोठे पूल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे धामणी खोऱ्याच्या पश्चिमेकडील गावांचे दळणवळण काही अंशी बंद झाले असून, पर्यायी मार्ग म्हणून म्हासुर्ली – चौधरवाडी बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू आहे. पावसाचा जोर वाढत गेल्यास हाही पर्यायी मार्ग बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धामणी नदीवरील गवशी,पणोरे,आंबर्डे,सुळे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर कुंभी नदीवरील गोठे -परखंदळे दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे नदीच्या पश्चिमेकडील हारपवडे,निवाचीवाडी,आंबर्डे,आकुर्डे,गोठे,गवशी,पाटीलवाडी येथील ग्रामस्थांना सध्या म्हासुर्ली -चौधरवाडी दरम्यानच्या बंधाऱ्यावरून शहराकडे प्रवास करावा लागत आहे.तसेच जर पावसाचा जोर कायम राहिल्यास हा बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच सध्या कळे – म्हासुर्ली मार्गावर अजून कुठे ही पुराचे पाणी आले नसल्याने धामणी नदीच्या पूर्व भागातील गावांचा शहराशी संपर्क सुरू आहे.









