वारणानगर , प्रतिनिधी
वारणा खोऱ्याला वरदान ठरलेल्या वसंत सागर या चांदोली धरणातून आज बुधवार दि.२७ रोजी सकाळी १० वा. पासून वक्रदरवाज्यातून २४५६ वरून ६७८० क्युसेसने विसर्गात वाढ केल्याने वारणा नदीकाठच्या गावांना पूराचा धोका वाढला असून सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती पाटबंधारे कोडोली विभागाचे सहा.अभियंता मिलींद किटवाडकर यानी दिली.
चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता वारणा धरण व्यवस्थापनाने धरणांतून चालू असलेल्या विसर्गात वाढ करुन वक्र द्वार मधून ५१५० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६३० क्युसेक असे एकुण ६७८० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली असून पुराचे पाणी सर्वत्र पात्राबाहेर वाढू लागले आहे यापूर्वी पूरक्षेत्रात बाधीत झालेल्या वस्ती,घरे,जनावरे यांचे तातडीने तात्पुरते स्थलातर करण्यासाठी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे असे मिलींद किटवाडकर यानी सांगीतले.
३४.४० टीएमसी क्षमता असलेल्या चांदोली धरणात २८.९३ टीएमसी पाणी साठा झाला असून ८४.१० टक्के धरण भरले आहे. धरण क्षेत्रात आजपर्यन्त १०५५ मि.मी. पाऊस पडला असून पाणलोट क्षेत्रात १४४४३ क्युसेसने पाण्याची आवक झाली आहे यासाठी विसर्ग वाढवण्यात आल्याचे किटवाडकर यानी सांगीतले.