Kolhapur Rain Update : कोल्हापुरातील संभाव्य पुराच्या पहिल्या टप्प्यात येणाऱ्या 28 गावातील शाळा उद्यापासून सुट्टी देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संबंधित शाळेत गावात निवारा केंद्र उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या कोयना विसर्ग सुरु असून राधानगरी धरण ही 95 टक्के भरले आहे.राधानगरीतून विसर्ग सुरु होताच 15 ते 18 तासात पाणी आपल्याकडे येते. 2019 आणि 2021 च्या अनुभवानुसार वेळीच सुरक्षा घेणे गरजेचे आहे.जिल्हा प्रशासन संपूर्ण तयारीत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नागरीकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी नागरीकांना मदतीची गरज भासेल तेव्हा त्यांच्यासाठी संपर्क नंबर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरण जवळपास संपूर्ण भरत आले आहे. केव्हाही दरवाजे उघडू शकतात. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याआधीच काळजी घेतली जात आहे. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयतील तळमजला तातडीने स्थलांतरीत करण्याचे आदेश राहूल रेखावार यांनी दिले आहेत.यानंतर संबंधित विभागांनी स्थलांतरण प्रक्रिया सुरु केली आहे.









