उत्पादन खर्च तरी मिळावा म्हणून ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांची धडपड
By : गजानन लव्हटे
सांगरूळ : धो-धो पाऊसामुळे शेतकऱ्यांची धावपळ सध्या सर्वत्र सुरु आहे. जे काही मिळेल ते पदरात घ्यायचे म्हणून शेतातील पिके वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहेत. कोल्हापूरच्या सांगरुळमधील शेतकऱ्याची देखील अशीच धडपड सुरु आहे. अवकाळी पावसातून मार्ग काढत कसा बसा भुईमुग काढला. शेतातील भुईमूगाच्या शेंगांमधून किमान उत्पादन खर्च तरी मिळावा म्हणून या शेतकऱ्याने शहरातील वस्तीत ओल्या शेंगा विकायला सुरुवात केली आहे.
अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करत या शेतकऱ्याने शेंगा तोडून घेतल्या. तोडलेल्या शेंगांना मोड येऊन कुजून जाण्याच्या भितीमुळे त्यांनी तोडलेल्या ओल्या शेंगा थेट कोल्हापूर शहर किंवा उपनगर विकण्यास सुरुवात केली. ते सध्या शहर, उपनगर गाठून दारोदारी फिरत शेंगा विकत आहेत. पावसातून पायपीट करत किमान केलेला खर्च तरी मिळावा या अपेक्षेने शेतकरी जीवाच्या आकांताने आटापिटा करताना दिसत आहेत.
सांगरुळच्या या शेतकऱ्याने ओल्या शेंगाचे पोते थेट पाठीवर घेऊन कोल्हापूर शहर व परिसरातील उपनगरात जाऊन दारोदारी फिरून मावशी, काका, मामा, दादा असा आवाज देत शेंगा विकल्या आहेत. काही ठिकाणी आपुलकीने शेंगा घेतल्या गेल्या तर काही ठिकाणी नुसतीच विचारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या न परवडणाऱ्या उत्पादन खर्चातून मार्ग काढत शेतकरी न डगमगता मोठ्या हिमतीने आपली शेती कसत आहे. निसर्गाच्या ताकदीपुढे कोणाचे काही चालत नाही. यामध्ये शेतकरी सुद्धा हतबल होताना दिसतोय. आता या शेतकऱ्यांना वाली कोण अशा सवाल उपस्थित होत आहे.








