प्रतिनिधी,कोल्हापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजने अंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या स्थानकाचा समावेश झाला असून यासाठी 43 कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला आहे. गेली चार वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून या कामाचा शुभारंभ रविवार 06 ऑगष्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
मंजूर निधीतून अद्ययावत प्रवेशद्वार, विस्तिर्ण पार्किंग, पादचारी मार्ग, प्लॅटफॉर्म विस्तारीकरण, पाणी, ड्रेनेज, स्वच्छतागृहे, रस्ते, दिशादर्शक फलक, बुकींग व्यवस्था, वेटींग रुम आदी कामासह विविध विकास कामांचा आराखडा तयार करुन रेल्वे स्थानकाचे मॉडर्न पध्दतीने सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच पारीख पुलाजवळील पादचारी पुलाच्या आराखड्यास पुणे रेल्वे विभागाने नुकतीच मंजूरी दिली असून या पादचारी पुलासाठीही निधीची तरतूद केली जाणार आहे.
खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर रेल्वे स्टेशनची इमारत ही 137 वर्षाची जुनी इमारत असून या रेल्वे स्थानकातून वर्षाला अंदाजे 40 लाख प्रवाशी प्रवास करतात. यातून रेल्वे विभागास महिन्याला सरासरी 4 कोटी तर वर्षाला 50 कोटी रुपयेचे उत्पन्न मिळते. परंतू इतके उत्पन्न मिळूनही या स्थानकामध्ये प्रवाशांच्या सुविधांचा मात्र वानवा आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित विविध प्रश्नाबाबत पुणे विभागाचे तत्कालीन वरीष्ठ वानिज्य प्रबंधक सुनिल शर्मा यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत 20 फेब्रुवारी 2020 रोजी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करुन प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासह मॉडेल रेल्व स्टेशन बनविण्यासंदर्भात बैठक घेवून आराखडा तयार करुन तो रेल्वे मंत्रालयास सादर करण्यात आला होता. नुकताच कोल्हापूर रेल्वे सुशोभिकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने गेली चार वर्षे केंद्र शासनाकडे मी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आलेले आहे.
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गास निधीची तरतूद करणे, कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे, कोल्हापूर रेल्वे स्थानक मॉडेल स्टेशन बनविणे, कोल्हापूर येथून देशभरात लांब पल्याच्या रेल्वे गाड्या सुरु करणे. तसेच कोरोना कालावधीत सह्याद्री एक्सप्रेससह बंद करणेत आलेल्या सर्व गाड्या पुर्ववत सुरु करणे आदी मागण्यासह कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नासंदर्भात तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल, विद्यमान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असून कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.









