बाळासाहेब उबाळे,कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने 1886 साली कोल्हापूर-मिरज या मार्गावर रेल्वे सेवा सुरु केली. या रेल्वे मार्गाचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले. पण इतक्या वर्षात कोल्हापूर रेल्वेची गती आणि नवीन रेल्वे गाड्या वाढणे अपेक्षित होते. पण अजूनही गती मिळालेली नाही. अजूनही कोल्हापूर-मिरज हा रेल्वे मार्ग एकेरीच आहे. त्यामुळे 133 वर्षानंतरही कोल्हापूर रेल्वे एकाच ट्रॅकवर आहे. या मार्गाचे दुहेरीकरण झाले तरच नवीन अन्य मार्गावर नवीन तसेच ‘वंदे भारत’ सारख्या गाड्या सुरु होणार आहेत.
रेल्वेचा प्रवास परवडणारा आणि सुरक्षित असल्याने प्रवाशांची पहिली पसंदी रेल्वेला असते. पण सध्या वाढलेल्या गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास असुरक्षित बनला आहे अशी भावना रोजच्या प्रवाशातून होत आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसचे प्रवासी असुरक्षितता अनुभवत आहेत. कोल्हापूर-मुंबई मार्गावर महालक्ष्मी आणि कोयना या एक्सप्रेस धावतात. महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री धावते आणि कोयनेपेक्षा तिचा वेगही अधिक आहे.यामुळे नोकरदारासाठी महालक्ष्मी एक्सप्रेस सोयीस्कर आहे. कोरोनापासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस बंद केली आहे.
प्रवाशांनी मागणी करुनही ही गाडी अद्याप सुरु केली नाही. यामुळे प्रवाशांचा सर्व ताण महालक्ष्मी एक्सप्रेसवर पडत आहे. आगाऊ तीन महिने महालक्ष्मी एक्सप्रेसचे आरक्षण केले तरच तिकिट मिळते. ऐनवेळी प्रवास करायचा म्हटले तरी या गाडीचे तिकिट मिळू शकत नाही. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईहून सातारा-सांगली-मिरज- कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांना नेहमीच कटु अनुभवाला सामेरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्समधून या गाडीत कल्याणपर्यंतचे स्थानिक प्रवासी गर्दी करतात. आरक्षित डब्यातही स्थानिक प्रवासी गर्दी करत असल्याने सातारा-सांगली-मिरज-कोल्हापूरच्या प्रवाशांचे आरक्षण असूनही कल्याणपर्यंत त्यांना ताटकळत उभा राहून प्रवास करावा लागत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेसचे कोच वाढवण्यासह ते बदलण्याचीही गरज आहे. तसेच बंद केलेली सह्याद्री एक्सप्रेस सुरु करुन अन्य एक जलदगती एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
कोल्हापूरातून सुटणाऱ्या सर्वच रेल्वे हाऊसफुल्ल
कोल्हापूरातून सध्या मुंबई,धनबाद,दीक्षाभूमी,कलबुर्गी,अहमदाबाद, तिरुपती या मार्गावर एक्सप्रेस गाड्या धावतात.सध्या सुटीचा हंगाम सुरु झाला आहे. यामुळे या सर्वच एक्सप्रेस हाऊसफुल्ल असून प्रवाशांची गर्दी होत आहे.ही गर्दी टाळण्यासाठी किमान हंगामी विशेष रेल्वे सुरु करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
लवकरच रेल्वे राज्यमंत्र्यांबरोबर बैठक
महालक्ष्मी एक्सप्रेसचे कोच बदलण्यासह बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस सुरु हा प्रश्न आहे. याबाबत काही महिन्यापूर्वी दिल्लीत बैठक झाली आहे. लवकरच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत कोल्हापूर रेल्वेचे आणि विकासकाबाबत चर्चा करुन ती कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोल्हापूरात नवीन रेल्वे सुरु करायच्या असतील तर कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणे महत्वाचे आहे. तरच नवीन गाड्या सुरु करता येतील. यासाठीही प्रयत्न आहेत.
धनंजय महाडिक- खासदार
कोल्हापूरातून सुटणाऱ्या एक्सप्रेस
महालक्ष्मी एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस,निजामुद्दीन्न(दिल्ली), हैद्राबाद,महाराष्ट्र एक्सप्रेस-(नागपूर), अहमदाबाद, तिऊपती, धनबाद एक्सप्रेस
Previous Articleअंबाबाईच्या गरुड मंडप नूतनीकरणाचं काम अधांतरीतच
Next Article पाणी संकट कायम, 75 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा









