रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्हय़ातील उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. संभाजीराजेंच्या राज्यसभा मोहिमेला जाहीर पाठिंबा देणारे बालदी राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी रायगड जिल्हय़ातील उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पुढे येत त्यांना जाहीर पाठबळ दिले. त्यांनी संभाजीराजेंच्या राज्यसभा निवडणुकीच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
दरम्यान, संभाजीराजे यांनी सोमवारी आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी आमदार महेश बालदी यांचे विशेष आभार मानले. राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडी आणि भाजपकडे नजरा
संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या अपक्ष म्हणून लढण्याच्या भूमिकेला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच विरोधी भाजप हे राजकीय पक्ष पाठिंबा देणार काय?, त्यांचे आमदार कोणती भूमिका घेणार याबद्दलही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
संभाजीराजेंचा सर्व पक्षीय आमदारांशी संवाद
राज्यसभेची निवडणूक पुढील महिन्यात जूनमध्ये होणार आहे. त्यासाठी संभाजीराजे यांनी सर्वपक्षीयांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ते विविध राजकीय पक्षांचे नेते, आमदारांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी संवाद सुरू आहे. गाठीभेटी सुरू आहेत.