कुचबिहार ट्रॉफीत देशात सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज म्हणून गौरव
संग्राम काटकर,कोल्हापूर
कोल्हापूर: कोल्हापुरी क्रिकेट विश्वात डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून गाजत असलेल्या अभिषेक निषाद याने आंतरजिल्हा, राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 186 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. अवघ्या सहाच वर्षात त्याने ही मोठी मजल मारली आहे. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत झालेल्या कुचबिहार ट्रॉफी 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत तर अभिषेकने 7 सामन्यात 44 बळी घेतले. या कामगिरीमुळे तो कुचबिहार ट्रॉफीत देशात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून नावारुपाला आला. धुव्वाँधार फलंदाजी करणाऱ्या आणि खेळपट्टीवर टिकून राहणाऱ्यांच्या दांडय़ा गुल केल्याने अभिषेकच्या गोलंदाजीची छाप एमसीए, बीबीसीआयवर पडली आहे. त्यामुळे त्याच्यातील आत्मविश्वास रुंदावला आहे.
अभिषेक हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदार संघातील रहिवाशी. गोरखपूरमध्ये अभिषेक जन्मला असला तरी क्रिकेटमधील त्याची जडणघडण कोल्हापुरातच झाली. व्यवसायाच्यानिमित्ताने कोल्हापुरात स्थायिक असलेले वडील राकेश व आई गुड्डी यांनी मुलगा अभिषेकला कोल्हापुरात आले. तो तवण्णाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत असताना त्याला अनिल सांगावकर क्रिकेट ऍपॅडमीत दाखल केले. शिवाजी विद्यापीठातील मैदानात सराव करताना अभिषेकला गोलंदाजीत रस वाटला. टीव्हीवर भारतीय क्रिकेट संघाचे सामने पाहताना गोलंदाज रविंद्र जडेजा प्रमाणेच डावखुरा गोलंदाज होण्याचे अभिषेकने ठरवले. प्रशिक्षक अनिल सांगावकर यांनीही त्याचा कल पाहून फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अगदी मनापासून गोलंदाजीचा सरावात करताना त्याने खेळपट्टीवर टाकलेला चेंडू चांगली फिरकी घेऊ लागला. पुढील दोन वर्षातच तो एक तयारीचा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला.त्याच्याच जोरावर तो निमंत्रितांच्या स्पर्धेसाठीच्या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून आयोजित केल्या जाणाऱ्या जिल्हा संघ निवड चाचणीत व राष्ट्रीय स्पर्धेसाठी एमसीए आयोजित राज्य संघ निवड चाचणीत सहभागी होऊ लागला.
चाचणीत त्याने केलेली फिरकी गोलंदाजी संघ निवड समितींच्या नजरेआड झाली नाही. निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी तर त्याला सतत जिल्हा संघात स्थान मिळू लागले. 2016-17 साली कागलमधील शाहू क्रिडांगणावर झालेल्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत त्याने 7 सामन्यात 42 बळी घेण्याचा करिष्मा करुन दाखवला. बीबीसीआय आयोजित चार दिवशीय पश्चिम विभागीयसह (2017-18), विजय मर्चंट ट्रॉफी, कुचबिहार ट्रॉफी (2019-20) क्रिकेट स्पर्धेतही त्याने महाराष्ट्र 14, 16 व 19 वर्षाखालील मुलांच्या संघातून खेळताना 24 बळी घेऊन नामवंत गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले.
हेही वाचा- १३ वर्षीय अ.लाट चा जिनेंद्र ठरतोय देशात भारी, ओहवाले मिनी जीपी इंडिया सेरीजमध्ये २ वेळा विजयी
गहुंजे स्टेडियममध्ये नोव्हेंबर 2021 ला एमसीएने कुचबिहार ट्रॉफीसाठी महाराष्ट्र 19 वर्षाखालील मुलांचा संघ निवड चाचणी घेतली. त्यातही हॅटट्रीकसह 5 बळी घेतलेल्या अभिषेकला निवड समितीने सुरत, कोलकातामध्ये झालेल्या कुचबिहार ट्रॉफी महाराष्ट्र संघातून खेळण्याची संधी दिली. तिचे सोनं करत त्याने देशातील 33 संघांमधील फलंदाजांवर हुकुमत गाजवत 7 सामन्यात 44 बळी घेतले. तसेच गुजरातमधील विनू मंकड ट्रॉफीत 10, सी. के. नायडू ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत 5 तर दोन दिवसीय एनसीए टुर्नामेंटमध्ये 7 बळी घेऊन जादुई फिरकी गोलंदाजीचा दबदबा राखला. विनू मंकड ट्रॉफीच्यानिमित्ताने गुजरातमधील जगातील सर्वात मोठय़ा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गोलंदाजी करण्याचे भाग्य अभिषेकला लाभले. सध्या त्याने रणजी ट्रॉफी खेळण्याची लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले असून त्या दृष्टीने तो सरावाला लागला आहे.
डोमेस्टिक स्पर्धांमध्ये ही अभिषेकचा दबदबा…
कोल्हापूर शहरासह सांगली, सातारा, कराड, जयसिंगपूर, शिर्डी येथे डेमेस्टिक पातळीवर झालेल्या शंभराहून अधिक एकदिवसीय, दोन दिवसीय 14, 16 व 19 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत अभिषेक हा सांगावकर ऍपॅडमीकडून खेळला. या स्पर्धांमध्ये त्याने सुमारे 200 बळी घेण्याचा टप्पा ओलांडला. 20 ते 25 सामन्यात त्याने प्रत्येकी पाच बळी घेऊन विरुद्ध निम्मा संघच गारद करुन दाखवला आहे. अखंडीत सराव आणि खेळपट्टीवर वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याचे कौशल्यामुळे वयाच्या 18 वर्षी अभिषेक हा क्रिकेटचे मैदान गाजवत आहे.
अनिल सांगावकर (संस्थापक व प्रशिक्षक ः अनिल सांगावकर क्रिकेट अॅकॅडमी)