पर्यावरणपूरक डेकोरेशनमध्ये फुल, फळांचा वापर; दुर्वा, आगाडा, जास्वंद, झेंडू, सफरचंद, मोसंबी, पेरू, चिकू, सिताफळाच्या मागणीत वाढ
कोल्हापूर प्रतिनिधी
गणपती पूजनात दुर्वा, आगाडा, जास्वंदी फूलाला अत्यंत महत्व आहे. गणेश आगमना दिवशी भाविकांकडून दुर्वा, फुल आणि फळांना प्रचंड मागणी होती. परिणामी फुलांसह फळांचे दर वधारले आहेत. 10 ते 15 रूपयांना दुर्वा आणि आगाडय़ाची एक पेंडी होती. तर दहा रूपयांना दोन जास्वंदीची फुले होती. तरीही भाविकांकडून फळ, फुलांना मोठी मागणी होती.
गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर पुजेसाठी लागणारा दुर्वा, आगाडा, झेंडू, अष्टर, जास्वंदीच्या फुलासह फळही लागतात. त्यामुळे बुधवारी बाजारात या पुजेच्या साहित्याचे दर वधारले होते. हराळी, आगाडय़ाशिवाय गणपतीची पूजाच होवू शकत नसल्याने भाविकांनी मागेल त्या दरात खरेदी केली. यातून शेतकरी, फुलवाले यांचा हजारो रूपयांचा व्यवसाय झाला. गणेशोत्सव फळ, फुल व्यापाऱयांच्या फायद्याचा ठरणार आहे. झेंडू 150 ते 160 रूपये किलो, गलाटा, शेवंती 180 रूपये किलो, गौरीची फुले 100 रूपये किलो, अष्टर 80 रूपये किलो, कमळ 20 रूपयांना एक, गुलाब, जरबेरा, 10 रूपयांना एक, केवडा कणीस 20 रूपयांना एक, गजरा 20 ते 30 रूपयांना एक. 50 रूपयांना पाच फळे, मोसंबी, सफरचंद, चिकू 100 रूपयांना किलो, डाळींब 50 रूपयांना किलो, पेरू 60 रूपयांना किलो यासह अन्य फळांच्या दरातही वाढ झाली आहे. तरीही भाविकांकडून फुलांसह हारांनाही मोठी मागणी असल्याने शेतकऱयांसह व्यापाऱयांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. अंबाबाई मंदिर, कपीतिर्थ मार्केट, मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्के, राजारामपुरी मार्केट, कुंभार गल्ली, यासह चौकाचौकात हराळी, आगाडा आणि फुलांची विक्री सुरू होती.









