हातकणंगलेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर आमदार प्रकाश आवाडेंची हरकत : विभागीय आयुक्तांकडे सादर केली हरकत : प्रभाग रचना चुकीची असल्याचे सिद्ध करणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या विरोधात आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयात हरकत दाखल केली. राजकीय दबावाखाली येऊन ही प्रभाग रचना भौगोलिक संलग्नता डावलून चुकीच्या पद्धतीने केली असून योग्य न्यायासाठी प्रसंगी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार आहे. पण प्रभाग रचना चुकीचे आहे, हे सिद्ध करून दाखवणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
हरकत सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार आवाडे म्हणाले, हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण यांची केलेली रचना चुकीची आह.s याबाबत पंधरा दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना रीतसर पुराव्यासहित निवेदने देऊन यामध्ये दुरुस्ती करावी असे सुचवले होते. माझ्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा परिषद गट करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने आदेश दिले होते. पण याबाबत कोणतीही कारवाई न करता जुनेच सदोष प्रभाग प्रारूप प्रसिद्ध केले आहेत. प्रभाग प्रारूप करत असताना अक्षरशः राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दिल्याचे दिसते.
भौगोलिक संलग्नतेचा निकष डावलला
प्रभाग रचना करताना भौगोलिक संलग्नता, दळणवळणाचे रस्ते, डोंगर, व राज्य निवडणूक आयोगाचे दिशादर्शक, याचे पालन केले गेले नाही हे स्पष्ट दिसते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी वेगवेगळे दिलेले दाखले व नकाशे देऊन व काही मतदारसंघांमध्ये दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध नाहीत असे दाखले दिले आहेत. पूर्ण हातकणंगले तालुक्यातील मतदारसंघाची रचना करत असताना नियम धाब्यावर बसविले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे वकीलामार्फत रीतसर हरकती नोंदविल्या असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. हातकणंगले तालुक्यातील प्रसिद्ध झालेल्या प्रभाग प्रारूप रचनेच्या विरोधात शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह राजू मगदूम, अरुण इंगवले यांच्यासह हेरले, रूकडी, साजणी, रुई, तीळवणी, आळते, मजले, माले, मुडशिंगी, चोकाक, आदी गावातील सुमारे पंधरा हरकती दाखल झाल्या असल्याचे आमदार आवाडे यांनी स्पष्ट केले.
तर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
या हरकतींवर पुणे विभागीय आयुक्तांकडे 15 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये विभागीय आयुक्त झालेल्या चुका दुरुस्त करतील अशी अपेक्षा आहे. मात्र जर तिथे ही राजकीय दबाव टाकून काही चुकीचे झाले तर मग शेवटी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून केलेले प्रभाग प्रारूप हे चुकीचे कसे आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन चुकीचे करणाऱयांच्या विरोधात कारवाई करण्याचीही मागणी करणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.