शाहू मिल ते शाहू समाधी स्थळ मार्गावर हा उपक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीचे औचित्य साधून सध्या अनेक कार्यक्रम, उपक्रम सुरू आहे. शाहूकार्याचा जागर सुरू आहे. शाहूंच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी शहरातील शाहूप्रेमींनी शाहू प्रदक्षिणेचा अनोखा उपक्रम 1 मे या दिवशी राबविला. महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि शाहू कृतज्ञता पर्व असा त्रिवेणी संगम साधत शाहूप्रेमींनी शाहू मिल ते शाहू समाधी स्थळापर्यंत काढलेली शाहू प्रदक्षिणा शाहूकार्याचा जयजयकार करून गेली.
रविवारी सकाळी शाहू मिल येथे सर्व शाहूपेमी जमले. या ठिकाणाहून शाहू प्रदक्षिणा सुरू झाली. असंख्य शाहूप्रेमी शाहू मिल ते शाहू समाधीस्थळापर्यंत चालत गेले. या मार्गावर शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या साठमारी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह (शाहूकाळात पॅलेस थिएटर म्हणून ओळख), शाहू खासबाग कुस्तीचे मैदान, बिंदू चौकातील शाहू वैदिक स्कूल, टाऊन हॉलजवळील शाहूभक्त गंगाराम कांबळे यांचा स्मारकस्तंभ या जिवंत स्मारकांनाही शाहूप्रेमींनी अभिवादन केले. सहा किलोमीटरची प्रदक्षिणा राजर्षी शाहू महाराज की जय या जयघोषात सव्वा तासात पूर्ण झाली. 1 मे निमित्त जय महाराष्ट्रचा जयजयकार झाला. कामगार दिनाचे औचित्य साधून समस्त कामगार वर्गाचे टाळ्या वाजवून आभार मानले गेले, छत्रपती शिवाजी चौकात सर्व जण आले तेंव्हा जय शिवाजी-जय भवानी घोषणेने परिसर दुमदुमला. शाहू समाधी स्थळ येथे सर्वांनी नतमस्तक होत कृतज्ञता भावना व्यक्त केली. डॉ संदीप पाटील यांच्या शंखनादाने उपक्रमाला एक वेगळा आवाज दिला. प्रदक्षिणाच्या सुरवातीला स्पीकरवर लोकराजाने केलेल्या 18 गोष्टींबद्दल धन्यवाद देणारे ऑडिओ क्लिप वाजवली गेली.
उपक्रमाचे आयोजन सुधर्म वाझे यांनी राजू नांद्रे, मीनाक्षी नलावडे, नाना गवळी, सुयोग आवट, सचिन पाटील यांच्या सहाय्याने केले. उपक्रमास प्रसिद्ध ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ज्या भागांना भेटी द्याययच्या होत्या त्या वास्तूंची माहिती देणारे व्हिडीओ गेली 12 वर्षे शालेय मुलांसाठी शाहू प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणारे जावेद मुल्ला यांनी व्हिडीओ बनवले. उपक्रमात अश्विन भोसले यांच्या एबी एन्डोर ग्रुपने सहभागी होऊन प्रतिसाद दिला. डॉ. संदीप पाटील, दिलीप देसाई, पै. बाबा महाडीक, शाहीर राजू राऊत, अभियंता अभिजीत जाधव, माजी उपमहापौर संजय मोहिते, ऍड. राजेंद्र किंकर आदी सहभागी झाले होते. उपक्रम सुरू होण्यापूर्वी दिलीप शहा यांच्या शाहू हास्य क्लब मधील ज्येष्ठ नागरिकांनी लेझीम व डंबेल खेळाचे नेत्रदीपक खेळ केले. सुरुवातीला कुलकर्णी मॅडम शाहू कविता तर कांबळे दादांनी शाहू पोवाडा सादर केला. प्रदक्षिणा जेव्हा शाहूपुरी व्यापारी पेठेत आली तेव्हा माजी नगरसेवक दिलीप व शिवरूप शेटे, दिगंबर जाधव यांच्या ग्रुपने सर्वांना शिरा अल्पोपहार दिला. प्रदक्षिणा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बिपिन लटोरे व संजय भारमल, आदिनाथ पाटील सचिन पाटील, गणेश शिंदे, रवी गवळी, सागर गोसावी, रिया भट, किरण पाटील, महेश ढवळे, संदेश रेळेकर, श्रद्धा वाझे, वंदना मोहिते, शुभदा कुलकर्णी,राहुल पाटील, आशिष पाटील, यासीन राऊत, संदीप चौगुले, सुनील पाटील, दीपक भोसले, देवेंद्र साटम्। शशी नाईक नौशाद सय्यद, अप्पा माळगे यांनी परिश्रम घेतले.