कोल्हापूर, संतोष पाटील
Kolhapur Political News : राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी माजी मंत्री आ.हसन मुश्रीफ यांच्यावर नाराजीचा निशाना साधत बंडखोरीचे अस्त्र उचलले आहे.यानिमित्ताने राष्ट्रवादी अस्थिर करण्याची नामी संधी शिंदे गट शिवसेना आणि भाजपला मिळाली आहे.ए.वाय.सारख्या वजीराच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनाच चेकमेट करत आ. प्रकाश आबिटकर आणि के.पी.पाटील यांनाही रोखण्याची खेळी सुरू आहे.कागल,राधानगरी-भुदरगड विधानसभा आणि कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील मोर्चेबांधणी वेगावत असतानाच व्हाया बिद्री कारखान्यावर गुलाल उधळण्याचे मनिषा भाजप-शिंदे गटाने आखली आहे.ए.वाय.पाटील हे अस्त्र एकच असले तरी यानिमित्ताने घायाळ होणाऱ्यांची संख्या मात्र अधिक आहे.
कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीसाठी 12 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या निवडणुकीत हातात 16 पैकी 9 मतांचे बहूमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागल.या निवडणूकीमध्ये भाजप आणि ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे यांनी दोन मतांनी बाजी मारत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांचा पराभव केला होता.राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण फुटल्याने सत्ताधारी आघाडीला खिंडार पडले.तत्पूर्वी 2017मध्ये बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेवून शिवसेनेला चेकमेट देण्यात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यशस्वी ठरले होते.सत्ता आल्यावर बिद्री कारखान्याच्या चाव्य आपल्या हातात येतील हे ए.वाय.पाटील यांचे स्वप्न पुन्हा भंगले.2019 च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी के.पी.पाटील यांच्या पारडय़ात मत टाकल्याने विधानपरिषदेच्या आश्वासनावर ए.वाय.पाटील थांबले.निवडणुकीनंतर विधानपरिषदेसाठी पुन्हा के.पी.यांच्या नावाची चर्चा रंगल्याने ए.वाय.गटात नाराजी पसरली.
दरम्यान एप्रिल 2020मध्ये कोल्हापूर बाजार समितीवर अशासकीय मंडळ आले.समितीवर प्रशासक म्हणून वर्णी लागावी यासाठी ए.वाय.यांनी ताकद लावली परंतू तिथेही के.पी.पाटील यांनी बाजी मारली.अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी शासनकाळात महामंडळ मिळेल,ही आशाही फोल ठरल्यानंतर के.पी.आणि ए. वाय.या पाव्हण्या-मेव्हण्यात दुरावा वाढला.संस्थात्मक राजकारणात हसन मुश्रीफ हे के.पी.यांना बळ देत असल्याची तक्रार करुनही लहान आणि मोठय़ा पवारांनी दुर्लक्ष केल्यानेच के.पी.यांनी बंडाचे निशान हाती घेतले.खा.संजय मंडलिक यांच्या साथीने ए.वाय.पाटील हे शिंदे गटाचे शिलेदार होतील,अशी अटकळ बांधली जात आहे.वरवर राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष शिंदे गटात गेल्याचे चित्र असले तरी याचे मोठे राजकीय धुमारे उठणार आहेत.
राधानगरी-भुदरगड तालुक्याचा पुढचा आमदार मीच असेन,अशी घोषणा ए.वाय.यांनी केल्याने आ.प्रकाश आबिटकर गटात अस्वस्थता आहे.गुवाहाटी बंडखोरीच्या नाराजीचा सामना करताना बी प्लॅन म्हणून ए.वाय.यांच्या नावाची चाचपणी तर सुरू नाही ना? असा सवाल आबिटकर गटाकडून उपस्थित केला जात आहे. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत यापूर्वी भाजपने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती.खा. संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली बिद्री कारखान्यात प्रकाश आबिटकर,ए.वाय.पाटील यांच्यासह भाजपचे शिलेदार अशी युती होण्याचे संकेत आहेत.बिद्री कारखान्याच्या निमित्ताने जिह्याच्या राजकारणात पुन्हा दमदार एन्ट्री करण्याचा व्युहरचना खा.मंडलिक पर्यायाने शिंदे गटाची आहे.ए.वाय.पाटील यांच्या बंडखोरीच्या आडाने बिद्रीचे निवडणुकीची हवा शिंदे गटाकडून तापवली जाईल.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची रसद कायम राहिल याची जोडणी खा.मंडलिक यांच्याकडून सुरू आहे.तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बंडखोरीची चुणूक दाखवल्याने राज्यातील सत्तांतराचे प्रतिध्वनी गोकुळ दूध संघात उमठू शकतात.तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे दुवा म्हणून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना खा.मंडलिक हवे आहेत.कागल तालुक्यातील गटा-तटाच्या राजकारणात हसन मुश्रीफ यांची वाट बिकट करुन त्यामार्गाने संसदीय मार्ग बळकट करण्याची राजकीय खेळी शिंदे गटाकडून आखली जाईल.त्यासाठी पहिल्या टप्प्यात ए.वाय.पाटील यांना शिंदे गटात घेवून जिह्याध्यक्ष पदासह महामंडळ देण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत.दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ ए.वाय.पाटील यांची मनधरणी करत आहेत.मात्र,अभी नही तो कभी नही याबाण्याने ए.वाय.मैदानात उतरले आहेत.यासर्व घडामोडीत खा.संजय मंडलिक यांची भूमीका महत्वाची ठरणार आहे.यासर्व घडामोडीत राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवत,स्वतंत्र युती आघाडय़ाकरुन आपला गड साबूत ठेवण्यासाठी धडपडणारे नेते हे राजकीय चित्र येत्या सर्वच निवडणुकांत पुन्हा ठळकपणे दिसेल.
राजकीय सोयरिक वाढणार
विधानसभेत कोल्हापूरात टक्का वाढविण्याचे आव्हान असलेल्या शिंदे गट आणि भाजपकडून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी इनकमिंगची होलसेल ऑफर सुरूच राहणार आहे.याचाच एक भाग म्हणून बिद्रीच्या निमित्ताने भाजपने महाविकास आघाडीला ए.वाय.यांच्या रुपाने इशारा देत शह देण्याची तयारी केली आहे.बिद्री कारखाना निवडणुकीत जिह्याच्या राजकारणात कमबॅक करण्याची प्रतिक्षा भाजप-शिंदे गटाला आहे.आ.प्रकाश आबिटकर यांच्यासाठी कारखाना निवडणूक पॉलिटिकल बुस्ट ठरु शकते.मागील निवडणुकीत बिद्रीच्या निमित्ताने जिह्यातील अखंड राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या गळाला लागली होती.आता शिंदे गटाची ताकद आणि ए.वाय.पाटील या राष्ट्रवादीच्या मोहयाच्या आडाने पुन्हा मोठा डाव टाकला जाईल.पक्षीय व्यासपीठावर स्वतंत्र अस्तित्व राखणारे सर्वपक्षीय नेते आपला गड शाबूत ठेवताना विजयाचा गुलाल हेच सुत्र ठेवून सोयरिक करताना नजीकच्या राजकारणात दिसतील.संजय मंडलिक यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील वावर हेच अधोरेखित करतो.साखर कारखाना असो वा महापालिका,जिल्हापरिषद यासर्वच येवू घातलेल्या निवडणुकांत कोण कोणाला पाडण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी प्रयत्न करेल याची खात्री नसल्यानेच सर्वपक्षीय इच्छुक मात्र गॅसवर राहतील.
Previous Articleनाथपंथी डवरी समाजाचा उद्या कोल्हापुरात महामेळावा
Next Article गटसचिवांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे









