संततधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ; राजाराम बंधाऱयावर 32 फूट पाणीपातळी; 28 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर प्रतिनिधी
शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही घट होऊन पाणी पात्राकडे गेले. मात्र शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढून दिवसभर संततधार राहिली. त्यामुळे सायंकाळी पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर पडली. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे.
अधिक वाचा- मंत्रीमंडळ विस्तार…आषाढीनंतर
जिल्हय़ात पावसाचा कमीअधिक जोर आहे. गेल्या आठवडय़ात धरणक्षेत्रासह जिल्हय़ात झालेल्या पावसामुळे 5 जून रोजी मध्यरात्री पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा त्याच दिवशी गतिमान झाली. बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. शुक्रवारी दिवसभर उघडझाप राहिल्यामुळे पंचगंगा नदीचे पात्राबाहेर पडलेले पाणी पुन्हा पात्रात गेले. राजाराम बंधाऱयावरील पाणीपातळीत शुक्रवारी एक फूटाने घट झाली होती.
शनिवारी पहाटेपासून मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला. सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर संततधार राहिली. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊ लागली. शनिवारी सकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱयावर 30 फूट पातळी होती. तर सायंकाळी सात वाजता 31 फूट 6 इंच झाली. रात्री उशिरा ही पाणीपातळी 32 फूट झाली. पंचगंगा नदी घाटावर पात्राचे पाणी पुन्हा बाहेर आले आहे. तर जिल्हय़ातील 28 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शहरात जनजीवन विस्कळित
कोल्हापूर शहरात दिवसभर संततधार होती. यामुळे या पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक विस्कळित झाली. तर अनेक ठिकाणी वाहतूकीची मोठी कोंडी झाली. कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेला कसरत करावी लागली.
जिह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –
हातकणंगले- 11.3 मिमी, शिरोळ -8.2 मिमी, पन्हाळा- 30.7 मिमी, शाहूवाडी- 46.6 मिमी, राधानगरी- 54.3 मिमी, गगनबावडा-68.1 मिमी, करवीर- 23.5 मिमी, कागल- 24.2 मिमी, गडहिंग्लज- 24.6 मिमी, भुदरगड- 51.9 मिमी, आजरा-41.7 मिमी, चंदगड- 49.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.









