बाजारपेठांमध्ये कोट्यावधीची उलाढाल; गणेशभक्तांकडून आरास साहित्य, मखर, गौरी-शंकरोबाचे मुखवटे, मंदिर, दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी, गर्दीतून वाहतुकीची कोंडी
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेशोत्सव दोनच दिवसांवर असताना मिळालेली रविवारची सुट्टी कोल्हापूरकरांनी बाप्पांसाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्य खरेदीत व्यतीत केली. बाप्पांभोवती आरास कोणती करायची याचा आराखडा बांधूनच कोल्हापूरकर सकाळी 11 वाजल्यापासून खरेदीसाठी पडले होते. त्यामुळे आरास साहित्याच्या बाजारपेठांत दिवसभर हाऊसफुल्ल अशी गर्दी होती. या गर्दीत गणेशभक्तांनी आरास साहित्य, मंदिर, मखर, सॅटीनने कापडी मंडप, एलईडी लाईट, खिरीचे साहित्य खरेदी केले. गुजरीसह शहरातील सराफी पेढयांवर गणेशभक्तांनी किरीट, हार, तोडे, त्रिशूल-परशूपर्यंतचे सोन्या-चांदीचे अलंकारही खरेदी केले.
कुंभार गल्ल्याबरोबरच शहरात जागोजागी मांडलेल्या स्टॉलवर गौरी-शंकरोबाच्या मुखवट्यांसाठी महिलांची गर्दी होती. बाजारपेठेत दिवसभर गणेशभक्तांचे येणे-जाणे सुऊ राहिल्याने रविवारपासूनच गणेशोत्सवाला सुऊवात झाल्याचे वातावरण होते. घरोघरी पाच दिवसांचा आणि मंडळाकडे 10 दिवसांचा मुक्काम घेऊन गणरायाचे मंगळवारी 19 रोजी आगमन होत आहे. रविवारीच्या सुट्टीला गणेशभक्त शहराच्या दाही दिशांनी आराससह अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होत होते.
आरास साहित्याची खरेदीनंतर एलईडी लाईट, गौरी-शंकरोबाचे मुखवटे, बाप्पा व गौराईचे अलंकार घेऊनच गणेशभक्त बाजारपेठांमध्ये दाखल होत होते. सकाळी अकरानंतर महाद्वार रोड हाऊसफुल्ल होण्यास सुऊवात झाली. ताराबाई रोड, बाजारगेट, पानलाईन येथील दुकाने गणेशभक्तांनी भऊन गेली होती. काही दुकानाबाहेर वेटींगचे चित्र पहायला मिळाले. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी येथील बाजारपेठांमध्येही हेच चित्र होते.
गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी झाल्याने बाजारपेठांना जोडलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत राहिली. कुंभार गल्ल्यांसह ठिकठिकाणच्या स्टॉलवर गणेशमूर्ती बुकींगसाठीही गर्दी होती. बहुसंख्य स्टॉलवर नॅचरल बॉडी कलरच्या गणेशमूर्तींची मांडणी केली आहे. मूर्तीसाठी यंदा 10 ते 20 टक्के जादा पैसे मोजावे लागले.
गजबजली बाजारपेठ
बाजारपेठांमध्ये गौरीच्या पावलापासून ते बाप्पांच्या आसनापर्यंतच्या साहित्यांची मांडणी केली आहे. आरास साहित्यांच्या किंमती वाढल्या आहेत. तरीही गणेशभक्तही आवडीचे साहित्य खरेदी कऊ शकतील, इतक्या कमी किमतीतील आरास साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे गणेशभक्त हौसेने आरास साहित्य खरेदी करत आहेत. त्यांच्या वर्दळीने बाजारपेठा गजबजून गेल्या.
दीडशे ऊपयांपर्यत गौरीचे दागिने…
लखलखणारे दागिन्यांचे स्टॉलही लागले आहेत. तेथे हार, मनीमाळ, कर्णफुले, छल्ला, मुकुट, जोडवी, कमरपट्टा, बाजूबंधासह गौराईला नटवण्यासाठीचे लागणारे सर्व प्रकारचे दागिने मिळत आहेत. दागिने वीस ऊपयांपासून दीडशे ऊपयांपर्यतच्या किंमतीत खरेदी करता येत आहेत.
सायंकाळी गर्दी…
सकाळ, दुपारच्या तुलनेने दहा पटीने जास्तीची गर्दी सायंकाळच्या सुमारास कुंभार गल्ल्यांसह बाजारपेठांमध्ये झाली. गणेशभक्तांच्या गर्दीत अंबाबाईच्या दर्शनासह पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या परगावच्या लोकांची वाहनेही मिसळून गेली. शहरातील तालीम संस्था, मंडळांच्या गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकाही गर्दीतून मार्ग काढत काढत पुढे जात होत्या.त्यामुळे बाजारपेठांसह मिरवणूक मार्गांवर गलका उडला होता.









