पाल बु.॥ लघुपाटबंधारे प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
धामोड/प्रतिनिधी
पाल बुद्रुक (ता. राधानगरी) येथील प्रस्तावित लघु पाटबंधारे प्रकल्पास गेल्याच आठवड्यात मंजुरी मिळाली आहे. सोबत या प्रकल्पास २७ कोटी रुपयांची प्रशासकिय मान्यता देखील मिळाली असून पुनर्वसन विभागाच्या भिजत घोंगडे कारभाराला घाबरून येथील नागदेववाडी व मोहितेवाडी ग्रामस्थांनी प्रकल्प होण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
या प्रकल्पामुळे राधानगरी तालुक्यातील पाल बुद्रुक, पाल खुर्द, नागदेववाडी, मोहितेवाडी तर करवीर तालुक्यातील चव्हाणवाडी, भोगमवाडी, घानवडे व आरळे आदी गावातील नागरिकांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. कित्येक हेक्टर कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार प्रक्राश आबिटकर यांनी विशेष प्रयत्न करून मंजुरीसह २७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यताही मिळवली आहे. मात्र प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधीच नागरीकांनी विरोध केला आहे.
नागदेववाडी व मोहितेवाडी येथील सर्व लोकांच्या जमिनी या प्रकल्पात जात असल्याने आम्हाला एक गुंठा देखील जमिन शिल्लक रहात नाही असे मत संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधलेल्या ५३ प्रकल्यांपैकी एकाही प्रकल्पातील लोकांचे पुनवर्सन गेल्या चाळीस वर्षांत
पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या व्यथांची धास्ती घेतलेल्या येथील नागरीकांनी पुनर्वसन विभाग, पाटबंधारे विभाग व शासनावर आमचा विश्वास नाही. ‘आम्हाला प्रकल्प नको व पाणीही नको’ अशी भूमिका घेत प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रकल्प अन्यत्र हलवावा अशी मागणी करून याबाबतचे निवेदन संबधित विभागाला देण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत .