कार्वे / वार्ताहर
ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयात दरवर्षी होणारा नागपंचमीचा उत्सव यावर्षी स्थगित करण्यात आल्याची माहिती शाळेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ढोलगरवाडी सर्प शाळेमार्फत गेली 56 वर्षे पर्यावरण संवर्धन व लोक जागृतीसाठी सापांची शास्त्रीय माहिती यामध्ये विषारी, बिनविषारीसाप, सर्पदंश, प्रथमोपचार, सापाबद्दलची अंधश्रद्धा व गैरसमज याबाबतचे कै. सर्पमित्र बाबूराव टक्केकर यांच्या प्रयत्नातून हे काम आजपर्यंत अखंडपणे चालू आहे. याच सर्प शाळेतून हजारो सर्पमित्र तयार झालेत तर सर्प शाळेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने फायर ब्रिगेड, पोलीस, वनखाते यामधील कर्मचाऱ्यांना सर्पहाताळणीचे ट्रेनिंग ही दिले आहे. मात्र यावर्षी केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या निकषातील काही अटींची पूर्तता होईपर्यंत यावर्षीची नागपंचमी कार्यक्रम वनविभाग कोल्हापूर व परिक्षेत्र पाटणे यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे. यावेळी पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल आर. एफ.ओ. प्रशांत आवळे, वनपाल कार्वे क्षेत्राचे जी.एम. होगाडे, संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक एन. जी. यळळूरकर, सपो॔द्यान विभाग प्रमुख प्रा. सदाशिव पाटील, प्रकाश टक्केकर, व्ही.आर. पाटील, प्रा. एन. आर.पाटील, मधुकर बोकडे, संदीप टक्केकर उपस्थित होते.
सपो॔द्यानच्या विस्तीर्ण जागेसाठी संस्थेच्या व वनखात्याच्या वतीने तिलारी परिसरात जागा मिळवून विस्तीर्ण अद्यावत सर्पोद्यान तयार व्हावे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. यासाठी राजकीय, शैक्षणिक कार्यातील लोकांच्या मदतीची गरज आहे. असे मत यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी मांडले.









