विनोद सावंत,कोल्हापूर
महापालिकेतील ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांची दयनीय स्थिती आहे. यामध्ये आरोग्य निरीक्षक तर दहा वर्षापासून ठोकमानधनावर काम करत आहेत. एक दिवस कायम होईल या आशेवर ते तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. नवीन आकृतीबंधनुसार रिक्त जागांवर भरती करताना ठोकमानधनावरील आरोग्य निरिक्षकांना कायम करावे, अशी मागणी आहे.
कोल्हापूर महापालिकेमध्ये 35 टक्केच्यावर अस्थापनावरील खर्चा करण्यास मर्यादा आहेत. सध्या 52 टक्के खर्च होत असल्याने नव्याने भरती केली जात नाही. रोजंदारी, ठोकमानधनावर कर्मचारी घेतले जात आहे. यामधील बहुतांशी कर्मचारी कायम होण्याच्या आशेने 20 ते 25 वर्ष ठोकमानधन आणि रोजंदारीवर काम करत आहेत. यामध्ये अग्निशमन दलातील जवान, आरोग्य निरिक्षकांसह आदींचा समावेश आहे.
कोल्हापूर महापालिकेत सध्या 19 आरोग्य निरिक्षक कार्यरत आहेत. यापैकी केवळ 3 आरोग निरिक्षक कायम असून 16 आरोग्य निरिक्षक ठोकमानधनावर काम करत आहेत. 10 हजार पगारपासून हे कर्मचारी मनपात काम करत असून सध्या 14 हजार 500 रूपये पगार झाला आहे. यामध्येही कपात होवून हातात 12 हजार पडतात. वाढत्या महागाईमुळे त्यांची उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होते. कायम झाल्यानंतर सातवा वेतन आयोगानुसार पगारात वाढ होईल, या आशेवर ते काम करत आहेत. एका आरोग्य निरिक्षकाकडे शहरातील 9 ते 10 प्रभाग असून येथील रस्ते, गटारी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. जाग्यावर थांबून सफाई कर्मचारी, मुकादमांकडून ते कामे करून घेतात.
कोल्हापुरात 2019 आणि 2021 मध्ये आलेला महापूर आणि कोरोनामध्ये ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांनी कायम कर्मचाऱ्यांच्या तोडीने किंबहुना एक पाऊल पुढे जावून काम केले. कोरोनामध्ये तर जीव धोक्यात घालून काम केले आहे. कोल्हापूर महापालिकेने नवीन आकृतीबंध केला असून राज्यशासनाकडे मंजूरीसाठी पाठविला आहे. शासनाची मंजूरीनंतर यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. यानुसार रिक्त जागांवर ठोकमानधनावरील आरोग्य निरिक्षकांनाच प्राधन्या देऊन कायम करावे, अशी मागणी त्यांची आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी यासाठी मनपा प्रशासनासोबत बैठक घेतली होती. राज्यशासनाकडे त्यासाठी प्रयत्नही केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यामुळे ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
कुटूंबियांचीही प्रतिक्षा
आठ ते दहा वर्ष महापालिकेत काम करत असून एक दिवस कायम होतील, पगारात वाढ होईल, भविष्याची चिंता मिटेल, या आशेवर कर्मचाऱ्यांबरोबर त्यांचे कुटूंबिय आहेत. तुटपुंज्या पगारात त्यांच्याकडून उदरनिवार्ह होत आहे.
एकूण आरोग्य निरिक्षक -19
कायम आरोग्य निरिक्षक -3
ठोकमानधनावरील आरोग्य निरिक्षक -16
वेतन-14 हजार 500
प्रशासकांनी कायम करून न्याय द्यावा
महापूरात आणि कोरोनात केलेल्या कामाचा विचार करून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कायम करावे, अशी भावना ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांची आहे. प्रशासकीय पातळीवर वरीष्ठ अधिकाऱ्याच्या बदल्याची चर्चा आहे. डॉ. बलकवडे यांनी बदली होण्यापूर्वी ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करतील अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांची आहे.
कायम करण्यासाठी औद्योगिक न्यायालयात धाव
ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना नियमानुसार रिक्त जागांवर कायम करण्यासाठी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यावर आला असून ठोकमानधनावरील आरोग्य निरिक्षकांना लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
अजित तिवले, जनरल सेक्रेटरी, मनपा कर्मचारी संघ
-नवीन आकृतीबंधमुळे कायम होण्याची आशा पल्लवीत
-पदे मंजूर असल्याने मनपावर आर्थिक भार पडणार नाही.
-कोरोनातील कामाची पोहोच पावती देण्याची प्रशासनाला संधी
-अस्थापनावरील खर्चाची अट शिथिल करण्याची गरज
Previous Articleनालाकाठावरील कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष
Next Article अनगोळ परिसरातील वीज रविवारी रात्रभर गायब









