कोल्हापूर प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग वाढविल्याने महापालिकेच्या उपसा केंद्राजवळील नदीतील पाण्याची पातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे चित्र असताना सोमवारी पुईखडी आणि बालींगा उपसा केंद्र येथे महावितरण कंपनीकडून कामामुळे वीजपुरवठा बंद केला. यामुळे उपसा होऊ शकला नसल्याने शहरात पुन्हा पाणीबाणी झाली. 8 टँकरने 47 ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला.
पावसाळा लांबणीवर पडल्याने धरणातील पाण्याचा साठा कमी होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीमध्ये पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. परिणामी महापालिकेच्या उपसा केंद्राच्या येथे पूर्ण क्षमतेने उपसा होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेने पाटबंधारे विभागास धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली असून त्यानुसार विसर्गही वाढविला आहे. उपसा केंद्राच्या ठिकाणी 1758 फुटांवर पाण्याची पातळी आवश्यक असून सोमवारी दुपारपर्यंत 1757 फुटांवर पाणी आले होते. यामुळे बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर येथील उपसा केंद्रातून उपसा सुरू झाला आहे. बुधवारपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा मनपा पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
एक संकट दुर, दुसरे संकट समोर
एकीकडे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. दुसरीकडे सोमवारी पुईखडी जलशुद्धीकरण उपसा केंद्र आणि बालिंगा येथील उपसा केंद्राच्या ठिकाणी महावितरण कंपनीने कामनिमित्ताने वीजपुरवठा खंडीत केला. यामुळे उपसावर परिणाम झाल्याने सोमवारी पुन्हा शहरात पाणीबाणी झाली. एक संकट दूर होत असतानाच दुसरे संकट उभे राहिले.
रोज 160 एमएलडी पाणी आरक्षित ठेवा
नागदेववाडी, बालिंगा, शिंगणापूर या ठिकाणी उपसा केंद्र असून पुईखडी, बालिंगा व कसबा बावडा येथील शुद्धीकरण करून पाणी शहरात वितरीत केले जाते. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीच्या गरज लक्षात रोज 160 एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. या प्रमाणे पावसाळा कालावधी पर्यंत कोल्हापूर महापालिकेसाठी पाणीसाठी आरक्षित ठेवावे, अशा मागणीचे पत्र जल अभियंता नेत्रदिप सरनोबत पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता यांना पाठविले आहे.
खासगी टँकर, कॅनचे दरात वाढ
शहरात चार दिवसांपासून पाण्याचा बट्याबोळ उडाला आहे. महापालिकेचे टँकर सर्वच ठिकाणी येत नसल्याने नागरीकांना खासगी टँकर, कॅनने पाणी विकत घेण्याची वेळ आली. 30 रूपयाचे पाण्याचे कॅन 60 रूपयास विक्री केली जात आहे.
उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा
शासन आपल्या दारी उपक्रमाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज, कोल्हापूर दोऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापुरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचा मसेज जाऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता आहे.