राजकीय जोडण्या वेगावल्या, दोन महिन्यांत बिगुल वाजणार; नेत्यांची कसोटी
संतोष पाटील कोल्हापूर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची एकी कोल्हापूरकरांना रुचली का? राज्यसभा निवडणुकीतील विजयाने खासदार महाडिक गटाची ताकद खरंच वाढली काय? दहा वर्षापासून महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची कार्यपध्दती शहरवासियांना भावली? राष्ट्रवादीची ताकद कायम राहील का, दुभंगलेली शिवसेना महापालिकेत सन्मानजनक स्थान मिळवेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महापालिका निवडणुकीत दडली आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर जिह्यातील राजकीय सारीपाटावरील डावही बदलला आहे. जिह्यातील कारभारपणाची सूत्रे कोणाच्या हातात, यांची दिशा स्पष्ट होणार असल्यानेच महापालिकेची निवडणूक ही पॉलिटिकल लिटमस टेस्ट ठरेल.
महापालिकेत पक्षीय राजकारण आणण्यात आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा मोठा हात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे तर मनपात कमळ फुलवण्याचे स्वप्न आहे. महापालिका हा माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा विधान परिषदेचा मतदारसंघ असल्याने त्यांच्यासाठी येथील संख्याबळ विशेष महत्त्वाचे आहे. राज्यातील सत्तांतरानंतर मनपाच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंगमेकरसाठी निकराचा लढा असेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, उत्तर विधानभा पोटनिवडणुकीचा पराभव धुऊन काढण्याची संधी मनपा निवडणुकीत आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयाने महाडीक गटाचे नुसते कमबॅक नाही तर त्याने पुन्हा उभारी घेतल्याचे सभागृहातील आकडाच दर्शवेल. असे विविध राजकीय कंगोरे घेऊन यंदाची महापालिका निवडणूक होत आहे. नेत्यांची कसोटी पाहणाऱया या निवडणुकीत आतापासून राजकीय जोडण्या घातल्या जात आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजप-ताराराणी आघाडी आणि शिंदे गटाच्या एन्ट्रीने निवडणुकीत चुरस वाढली आहे. चंद्रकांतदादा आणि सतेज पाटील या दोन पाटलांची राज्यातील राजकारणातील वाट सन्मानजनक आणि प्रशस्त करणारी ही निवडणूक असल्याने ते ताकदीने तयारीला लागले आहेत. बंडखोरीनंतर शिवसेनेचे आत्मबळ वाढवणारी ही निवडणूक ठरणार आहे. आपली नवी राजकीय दिशा योग्य असल्याचे दाखवण्याचा माजी आमदार क्षीरसागर यांचा प्रयत्न असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भक्कम साथीने ते सावधपणे राजकीय जोडण्या घालत आहेत. यानिमित्ताने वरवर सरळ वाटणारा महापालिकेच्या राजकारणाचा अंतरंग मात्र आतून गुंतागुतींचा बनला आहे.
रणशिंग फुंकले
आमदार मुश्रीफ यांनी शिवाजी पेठेत कोटय़ावधी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ करत मनपा निवडणुकीची तयारी अप्रत्यक्षपणे सुरू केली आहे. महापूर आणि शहरवासियांना भेडसावणारे प्रश्न ही प्रशासनाची जबादारी आहे, ते सोडवण्याचा प्रयत्न करत आमदार सतेज पाटील यांनी शहरवासियांना आपत्तीकाळात आपण पाठीशी असल्याचे दाखवून द्यायचे आहे. क्षीरसागर यांनी शहराची हद्दवाढ करणार असल्याचे सांगत, महापालिकेची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. नवीन पालकमंत्री पदाच्या नेमणुकीनंतर भाजप ऍक्शनमोड येईल.
मॅजिक फिगर गाठण्याची शर्यत
महापालिकेत 41 प्लसची मॅजिक फिगर गाठण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी चुरस आहे. दोन्ही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी रणनिती आखतील. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. इतर पक्ष आणि नेत्यांची सन्मानजनक स्थान मिळवण्याचेच प्रयत्न असतील. महापालिकेत संख्याबळ वाढल्यानंतर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आमदार सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील या दोघांवर राजकीय दबाव वाढू शकतो. दोन पाटलांच्या या लढाईत खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे आणि अमल महाडिक आदी नेतही महापालिका निवडणुकीत आपल्यापरीने ताकद आजमावतील, असे चित्र आहे.