विनोद सावंत,कोल्हापूर
महापालिका निवडणुकीचे बिगुल नोव्हेंबरपर्यंत वाजण्याची शक्यता आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे.त्यामुळे सर्वच पक्षांकडून महापालिकेसाठी फिल्डींग लावली जात आहे.नेत्यांचे दौरेही वाढले असून पक्षातील कार्यकर्त्यांच्या बैठकांत ते पहिले टार्गेट महापालिका असेल,असे आवाहनही करत आहेत.आपल्याच पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकला पाहिजे.यासाठी आतापासून कामाला लागण्याचे आदेशही या नेत्यांकडून दिले जात आहेत.
कोल्हापूर महापालिकेसह राज्यातील 11 महापालिकांच्या निवडणुकीचे घोंगडे भिजत आहे. 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या पहिली लाटेपासून निवडणूक लांबणीवर आहे.कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ओबीसी आरक्षण,प्रभाग रचनामध्ये बदल, प्रभाग संख्या यामुळे अडीच वर्ष झाली मनपाच्या निवडणूक होऊ शकलेली नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे भाजपच्या ‘घर चलो संपर्क अभियाना’च्या प्रारंभ प्रसंगी ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिकेच्या निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेची निवडणूक होणार असून पहिले टार्गेट महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे असेल,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचाच झाला पाहिजे,असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.त्यानंतर सर्वच पक्षातील नेत्यांनी महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राज्यातील सत्तेत जास्तीची पदे पाहिजे असल्यास जिल्ह्यातील आमदारांची संख्या वाढवली पाहिजे.महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणले पाहिजेत. असे केले तर महाविकास आघाडीमध्ये पद वाटपावेळी कोल्हापूरकरांच्या बाजूने झुकते माप दिले जाईल,अशी ग्वाही दिली.
महापालिकेत संख्याबळ वाढण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. संघटनात्मक ताकद वाढवली पाहिजे. शहरात नुसते स्वत:चे फोटो असलेले फलक लावून नागरिकांची मने जिंकता येत नाहीत.त्यासाठी नागरिकांच्या लहान-मोठ्या समस्या सोडवल्या पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले होते.एकूणच भाजप,राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांतील नेत्यांची टार्गेट महापालिका आहे.त्यानुसारच पक्षातील नवीन पदाधिकारी निवडीही केल्या जात आहेत.
महाविकास आघाडी की स्वबळावर….
महाविकास आघाडीने लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणूक एकत्र लढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.मात्र, महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर.., याबाबत सध्यातरी कोणतेही स्पष्टता नाही.महाविकास आघाडी झाली तर बंडखोरीचा धोका होण्याची शक्यता आहे.त्यामुळे एखाद्या वेळेस काही प्रभागात महाविकास आघाडी एकच उमेदवार देऊ शकते.तर काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊन निकालानंतर महाविकास आघाडी होऊ शकते.दुसरीकडे भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेना शिंदे गट यांची आघाडी होणार असे सध्यातरी चित्र आहे.
महापालिका निवडणूक ठरणार लिटमस्ट टेस्ट
रखडलेली महापालिका निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पूर्वी महापालिका निवडणूक ही लिटमस्ट टेस्ट ठरणार आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचना शक्य
प्रभाग रचना नेमकी कशी असणार, हे अद्यापी गुलदस्त्यात आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वीच 2017 च्या प्रमाणे निवडणूक घेण्याचे आदेश काढले आहेत. यावेळी चार सदस्यीय प्रभाग रचना होती. पुणे आणि सांगली निवडणूक याप्रमाणेच झाली होती. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचना अंतर्गत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास प्रस्थापित आणि तगडे उमेदवारांचे पारडे जड असणार आहे. तर सर्वसामान्यांचा पत्ता कट होणार आहे.
Previous Articleशिंगाडी कुटुंबातील ‘त्या’ मुलांना मिळेल का आधार ?
Next Article गोव्यात 29, 30 मे रोजी पावसाची शक्यता









