सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या मागणीनंतर मनपाची ग्वाही : आठ गावातील 1 कोटी 33 लाखांची थकबाकी : आजपासून कारवाई : आठ दिवसांत सर्व कनेक्शन तोडण्यासाठी विशेष मोहीम
प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील पाणी कनेक्शन धारकांवर कारवाई करणारी महापालिका ग्रामीणमधील थकबाकीदारांवर कारवाई का करत नाही, असा सवाल गुरूवारी सर्व पक्षीय हद्दवाढ कृती समितीने केला. यावेळी ग्रामीणमधील कनेक्शन तत्काळ तोडा, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली. यावर उपायुक्त रविकांत अडसुळ यांनी आज, शुक्रवारपासून ग्रामीणमधील थकबाकी असणारी पाणी कनेक्शन तोडण्याची कार्यवाही सुरू करून आठ दिवसांत सर्व कनेक्शन बंद केली जातील, अशी ग्वाही दिली.
माजी महापौर आर.के. पोवार म्हणाले, एकीकडे हद्दवाढीतील प्रस्तावित गावे हद्दवाढीत येणार नाही, अशी भूमिका घेत आहेत. शहर हद्दवाढ समिती बिल्डर लॉबीचे एजंट असल्याचा आरोप करत आहेत. दुसरीकडे शहरातून पाणी घेतले जात आहे. या उलट महापालिका ग्रामीण भागातील पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई करण्याकडे कानडोळा करताना दिसत आहे. शहरातील सामान्य नागरिकांची थकबाकी असल्यास मनपा कर्मचारी कनेक्शन तोडतात. मग ग्रामीण भागातील थकबाकीदारांवर मेहरबानी का केली जात आहे, असा सवालही पोवार यांनी केला.
ऍड. बाबा इंदूलकर म्हणाले, सर्वाना एक सारखे नियम असले पाहिजेत. ग्रामिणमध्ये आठ गावातील 6 हजार 366 ग्राहकांना मनपा पाणीपुरवठा करत आहे. 1 कोटी 33 लाखाची थकबाकी आहे. आतापर्यंत शहरातील थकबाकीदारावर कारवाई झाली. मात्र, ग्रामिणमधील थकबाकीदारांवर कारवाई का करण्यात आली नाही. संबंधित कर्मचाऱयांवर नोटीस काढा, अशी मागणी केली. शिवसेनेचे किशोर घाटगे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबा पार्टे, अशोक भंडारे, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, अमरसिंह निंबाळकर, सुभाष देसाई, अनिल घाडगे, रघू कांबळे आदी उपस्थित होते.
तुमचे पाहुणे आहेत का?
ग्रामीण भागात पाणी पुरवठा करू नये असा 2014 पूर्वीच ठराव झाला असताना पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिकांना अपुरे पाणी मिळते. पण ग्रामीण भागात महानगरपालिकेने दिलेल्या कनेक्शनला 24 तास पाणी दिली जाते. ग्रामिणमधील ग्राहक मनपा अधिकाऱयांचे पाहुणे आहेत का? असा सवाल ऍड. बाबा इंदूलकर यांनी केला. भोगम कॉलनीमध्ये 6 इंची पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
कारवाई केल्यास सत्कार अन्यथा घरावर मोर्चा
ग्रामीणमधील पाणी चोरीचा पर्दाफाश कृती समितीनेच केला. ग्रामपंचयतीची थकबाकीही उघडकीस आणली. आता घरगुती कनेक्शन थकबाकीदारांची माहितीही कृती समितीने पुढे आणली. मग मनपाची यंत्रणा काय करते. संबंधित थकबाकीदारांचे कनेक्शन तोडा सत्कार करू अन्यथा घरावर मोर्चा काढू, असा इशारा आर.के. पोवार यांनी मनपा अधिकाऱयांना दिला.
गाव कनेक्शनधारक थकबाकी रक्कम
बालिंगा 135 5 लाख 77 हजार 761
नागदेववाडी 1648 45 लाख 90 हजार 74
पाचगांव-मोरेवाडी 2672 34 लाख 69 हजार 527
पाडळी 338 5 लाख 86 हजार 665
पिरवाडी 163 4 लाख 23 हजार 978
शिंगणापूर-हणमंतवाडी 1179 32 लाख 89 हजार 61
उचगांव 231 4 लाख 26 हजार 731
एकूण 6366 1 कोटी 33 लाख 63 हजार 797
आठ गावातील पाणी कनेक्शनची स्थिती
व्यावसायिक कनेक्शन-17
रहिवाशी-6285
औद्योगिक -64