पंचगंगा प्रदूषण : रोज दीड ‘एमएलडी’ सांडपाणी थेट पंचगंगेत : शहरवासियांकडून सलग चार वर्ष पूर्यावरणपूरक गणेशोत्सव : मनपाकडून नुसताच दिखावा : हिंदूत्ववादी संघटनांना मिळाला आयता मुद्दा : गणेशमूर्ती नदीत विसर्जनासाठी आग्रही
विनोद सावंत कोल्हापूर
महापालिकेच्या आवाहनानुसार शहरवासियांनी सलग चार वर्ष गणेशोत्सव पर्यावरणपूरक केला. दुसरीकडे महापालिका प्रशासन चार वर्ष हातावर हात ठेवून बसले. शहरातून पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी 100 टक्के रोखण्यात अपयशी ठरले. प्रदूषणाचा हाच मुद्दा पुढे रेटत हिंदूत्ववादी संघटनांनी यंदा पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जित करण्यावर भर दिला आहे. त्याची झलक दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाला त्यांनी दाखवूनही दिली आहे.
कोल्हापूरमध्ये गेल्या चार वर्षापासून 100 टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सव होत आहे. घरगुतीसह मंडळाच्या 56 हजारहून अधिक गणेशमूर्ती विसर्जन कुंडात विसर्जित करून इराणी खणीत विसर्जित केल्या. 2019 मध्ये महापूर आल्याने पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास मर्यादा आल्या. यानंतर सलग दोन वर्ष कोरोना असल्याने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या तीन वर्षात शहरातील सर्व घरगुती आणि सार्वाजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन इराणी खणीत झाले. मागली वर्ष उत्साहात गणेशोत्सव झाला. यावेळीही स्वय:स्फुर्तीने कोल्हापूर शहरवासियांनी मूर्ती घराजवळ मनपाने लावलेल्या विसर्जन कुंडातच विसर्जित केल्या. गेल्या चार वर्षाची परंपरा यंदाही कायम राहिल अशीच, अपेक्षा सर्वांची होती. परंतू हिंदूत्ववादी संघटना पंचगंगा नदीसह वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जनासाठी आक्रमक झाल्या आहेत. पोलीसांचा विरोध डावलून दीड दिवसाचे गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगा घाट येथे करण्यात आले. यावेळी हिंदूत्ववादी संघटनांनी महापालिका पंचगंगा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरली आहे. रोज लाखो लिटर सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. मग मनपा प्रशासन नदीत गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध कोणत्या आधारे करते, असा सवालही उपस्थित केले. पाच दिवसाच्या गणेश मूर्तीचे शनिवारी विसर्जन आहे. यावेळीही नागरीकांना नदीतच मूर्ती विसर्जन करण्याचे ते आवाहन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. या परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. गेल्या चार वर्षात ज्या अधिकारांने नागरीकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणात मनपाने स्वत: मात्र, पंचगंगा नदी, रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यात कोणतीच पावले उचलली नाही. जयंती नाला येथून थेट पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी आजतागयात रोखू शकलेली नाही. याचबरोबर 12 नाल्यापैकी 5 नाल्यातून नदीत सांडपाणी जात आहे. तसेच दुधाळी येथूनही परिसरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. हेच मुद्दे आता हिंदूत्ववादी संघटना पुढे करत नदीतच विसर्जन करणार या भूमिकेवर ठाम आहेत. दीड दिवसाप्रमाणे शनिवारी पाच दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळीही त्यांचा असाच पवित्रा राहणार आहे. चार वर्षात मनपाने प्रदूषणाबाबत ठोस उपाय योजना केल्या असता तर ही वेळ आली नसती.
मग सांडपाणी अधिभार जातो कुठे ?
मनपा पाणीपट्टीतून सांडपाणी अधिभार आकरणी करत आहे. वर्षाला 8 ते 10 कोटींचा अधिभार जमा होतो. एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषणाचे दुखणे कायम आहे. मग वसुल होणार सांडपाणी अधिभार जातो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरालगतच्या गावाचा भार मनपावर
कळंबा, पाचगांव, उचगांव, मोरेवाडी, कळंबा, शिंगणापूरचा काही भागातील सांडपाणी शहरात येत आहे. यासंदर्भात मनपाने ठोस कारवाई करण्याची गरज आहे. केवळ नोटीस दिली विषय संपला अशी भूमिका घेऊन चालणार नाही.
मनपाकडून रोज नदीतून पाणी उपसा-180 एमएलडी
नाले, गटरीतून येणारे सांडपाणी -104 एमएलडी
सांडपाण्यावर प्रक्रिया-102. 3 एमएलडी
रोज थेट नदीत मिसळणारे सांडपाणी-1.5 एमएलडी
कार्यरत एसटीपी प्रकल्प
लाईनबाजार- 76 एमएलडी
दुधाळी-17 एमएलडी
मनपा चुकली म्हणून आपण चुकायचे का?
महापालिका पंचगंगा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरली, हे वास्तव आहे. मनपा चुकली म्हणून आपणही चुकून चालणार नाही. चार वर्षाची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवणे आवश्यक आहे, असा सांगणारा एक मतप्रवाह आहे.