कोल्हापूर प्रतिनिधी
पाणीपुरवठा सुरळीत करावा अथवा घरटी 10 किलो दिवाळी फराळ महापालिकेने द्यावा, अशी अनोखी मागणी आखरी रास्ता कृती समितीने महापालिकेकडे केली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेने ऐन दसरा – दिवाळीत बालिंगा पंपींग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या शहरातील दाटीवाटीच्या भागातील पाणीपुरवठा दिवसाआङ केला आहे. यावर कोल्हापूरात तीव्र प्रतिक्रिया उमटून हे नियोजन रद्द करावे, अशी मागणी आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजन फोल ठरले असून महिला वर्गाला याचा त्रास होत आहे. कोल्हापूर जिह्यातील धरणे भरली असून काळम्मावाडीचे पाणी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला मिळणार हे पालकमंत्र्यासह नेते सांगत आहेत. या योजनेतील तांत्रिक अडचणी महापालिकेस दूर करता येत नाहीत. बंगलोर वरुन तज्ञ बोलवतात हे कसले रोज थेट पाईपलाईनचे पाणी देणार अशी भावना जनतेची आहे. यामध्येच मनपा प्रशासनाने 3 दिवस सलग पाणीपुरवठा बंद करणार असे जाहीर केले आहे. तरी महापालिकेने हे भोंगळ नियोजन त्वरीत मागे घ्यावे. महिलांचा दिवसातील सगळा वेळ पाणी भरण्यात जात असून दिवाळी या मोठ्या सणाचा फराळ करण्यास वेळ नाही. त्यामुळे प्रशासनाला जर दिवाळीपूर्वी हे नियोजन मागे घेता येत नसेल तर थेटपाईपलाइंनच्या ठेकेदाराचा दंड मागे न घेता त्याच पैशातून घरटी 10 किलो तयार दिवाळी फराळ द्यावा, अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्यावतीने समन्वयक किशोर घाटगे यांनी केली आहे.









