दुसरा महिना पूर्ण होत आला तरी पगार मिळेना : मुदत वाढ नसल्याने पगार दिला नसल्याचा प्रशासनाचा दावा : अगोदरच तुटपुंजा पगार तोही मिळण्यासाठी महिनाभर वेटींग
प्रतिनिधी/कोल्हापूर
दुसरा महिना पूर्ण होत आला तरी महापालिकेतील 350 ठोकमानधनावरील कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. अगोदरच तुटपुंज्या पगार, तोही मिळण्यासाठी आता महिनभर वेटींग करण्याची वेळ ठोकमानधनावरील कर्मचाऱयांवर आली आहे. मुदत वाढ दिली नसल्यामुळे पगार दिले नसल्याचा दावा प्रशासन करत आहे. कायम सोडाच ठोकमानधानुसार वेळेवर पगारही नाही, अशी स्थिती येथील कर्मचाऱयांची झाली आहे.
कोल्हापूर महापालिकेला अस्थापनावरील खर्च 35 टक्क्यांवर करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कर्मचारी भरती करताना कायम ऐवजी ठोकमानधनावर करण्यात येत आहे. वर्षभरासाठी ही भरती केली जाते. संबंधित कर्मचाऱयाचा पगार फिक्स असतो. एक दिवस महापालिकेत कायम होईल, या आशेवर हे कर्मचारी काम करतात. ठोकमानधनावरील बहुतांशी कर्मचाऱयांना 10 ते 16 हजार पर्यंत पगार आहेत. एकीकडे अशा तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. दुसरीकडे हा पगार मिळण्यासाठीही आता महापालिकेच्या फेऱया मारण्याची वेळ ठोकमानधनावरील कर्मचाऱयांवर आली आहे. वास्तविक जुन महिन्यांचा पगार किमान 10 तारखेपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, 22[ तारीख आली तरी महापालिकेने ठोकमानधनावरील कर्मचाऱयांना पगार दिलेला नाही. घरफाळा आणि नगररचना विभागातून दोन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळाल्याने जीएसटीच्या अनुदानाची प्रतिक्षा न करता मनपा प्रशासनाने कायम कर्मचाऱयांचे पगार आणि पेन्शन 5 जुलैला जमा केली. मात्र, 350 ठोकमानधनावरील कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. संबंधित विभागातील अधिकाऱयांनी ठोकमानधनावरील कर्मचाऱयांची मुदत वाढीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
मुदत वाढ दिलेलेही पगाराच्या प्रतिक्षेत
ठोकमानधनावरील 350 कर्मचाऱयापैकी काही कर्मचाऱयांची मुदत वाढ मिळाली आहे. परंतू प्रशासनाने सर्वच ठोकमानधनावरील पगार थांबवले आहेत. त्यामुळे मुदत वाढ असणाऱयांवरही पगाराची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.
अग्निशमनचे जवानही पगारापासून वंचित
महापूर, आग, भिंत कोसळणे, गॅस गळती अशा आपत्तीत जीव धोक्यात घालून काम करणारे ‘अग्निशमन’च्या 58 जवानांचीही मुदत वाढ करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुळातच हे जवान 10 हजार पगारावर जोखमीचे काम करत आहेत. तोही पगार वेळेवर मिळत नाही, हे दुर्देवी आहे. येथील काही जवानांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता दोन दिवसांत पगार देणार असल्याचे सांगण्यात आले.









