पूरस्थिती हाताळण्यासाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण : अतिरिक्त साधनसामुग्रीची उपलब्धता : मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरु : कृषी पंपांची 450 रोहित्रे केली जाणार स्थलांतरीत : 1 हजार 780 वीज खांबांचे सक्षमीकरण
कृष्णात चौगले /कोल्हापूर
2019 व 2021 या वर्षातील महापूरासह कोरोना काळात कोल्हापूर महावितरणची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी पुर्वानुभव व पूर्वतयारीच्या बळावर महावितरण सज्ज आहे. मान्सूनपुर्व देखभाल दुरूस्तीची कामे, पूराचा धोका लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना, पूरजन्य स्थिती हाताळण्यासाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण व अतिरिक्त साधन सामुग्रीची उपलब्धता अशी तयारी महावितरणने केली आहे.
कोल्हापूर जिह्यातील 1 लक्ष 52 हजार 891 कृषी पंप ग्राहक, 10 लक्ष 11 हजार 756 अकृषिक ग्राहकांना वीज सेवा पुरविण्याची जबाबदारी महावितरणच्या कोल्हापूर मंडळावर आहे. जिह्यात 6 विभागीय कार्यालये, 30 उपविभागीय कार्यालये, 176 शाखा कार्यालये, 21 अतिउच्च दाबाचे उपकेंद्र, 130 उच्चदाब उपकेंद्र, 922 विद्युत वाहिन्या (फिडर), 29 हजार 261 वितरण रोहित्रे असा महावितरणचा डोलारा आहे.
मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीपात्र व त्याजवळील वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाया झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. 14 हजार 653 वीज वाहिन्यांच्या गाळ्यातील वीज तारा ओढून घेण्यात आलेल्या आहेत. पूर प्रभावित भागातील 1780 वीज खांबांचे सक्षमीकरण व देखभाल दुरूस्ती करण्यात आले आहे.
पूराचा धोका लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना
वितरण रोहित्रांमध्ये पूराचे पाणी जाऊ नये म्हणून अद्यापपर्यंत 350 रोहित्रांच्या टॉपप्लेट आवळून घेऊन त्याला चिकट द्रव्य लावण्यात आले आहे. जून महिन्यानंतर (कृषिपंपांचा वापर बंद झाल्यानंतर) सुमारे 450 रोहित्रे स्थलांतर करण्याची योजना आहे. पावसाळा वा पूर संपल्यानंतर ते पुर्ववत बसविण्यात येतील. गावातील सरपंच व पोलिस पाटील यांच्याशी या संदर्भाने समन्वय साधला जाईल. पूराचे पाणी ज्या उपकेंद्रात जाते त्याठिकाणी अतिरिक्त बॅटरी चार्जर व रिले उपलब्ध केले आहेत. जेणेकरुन पूराचे पाणी ओसरल्यावर नियंत्रण कक्ष त्वरीत चालू करता येईल. विद्युत साहित्य व उपकरणे कोरडी करण्यासाठी महावितरणने गॅसवर आधारीत पूरेसे हॉटब्लोअर्स विकत घेतले आहेत.
पूरजन्य स्थिती हाताळण्यासाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण
महावितरणने कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळून जलद कामे करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. महावितरणकडे 215 अभियंते, 1176 तांत्रिक कर्मचारी, 1059 बाह्य स्त्रोत कर्मचारी, 976 ठेकेदाराचे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लाइफ जॅकेट, बोट, सर्चलाईट, रबरी हात मोजे, झुले आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.
अतिरिक्त साधन सामुग्रीची उपलब्धता
संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन 407 रोहित्र, 2000 वीज खांब, 73 किलोमीटर केबल, 103 किलोमीटर विज तारा, 2100 वीज मीटर इत्यादी साहित्य उपलब्ध करून ठेवले आहे. त्यासोबतच 40 वाहने, 5 क्रेन भाडेतत्वावर व 1 बूम वाहन उपलब्ध ठेवण्यात आले आहे.