कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी
कोल्हापूर प्रतिनिधी:
मान्सूनपूर्वची १२ तासांहून अधिक बरसात, जनजीवन विस्कळीत कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाची आजही संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील दैनंदिन जनजीवन विस्कळित झाले आहे.
मान्सूनपूर्व पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून सखोल भाग असणाऱ्या ठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी यलो अलर्ट जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा जोर पुढील दोन दिवस राहणार आहे. जिल्ह्यात सरासरी कमाल तापमानाची २९.३ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमानाची २४.८ डिग्री सेल्सिअस इतकी नोंद झाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी आंबा विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. काढणीला उशीर झालेल्या पिकांना या मान्सून पूर्व पावसाचा फटका बसला आहे. तर मान्सूनपूर्व मशागतीची कामाला ब्रेक लागला आहे.
राधानगरीसह तालुक्याच्या पश्चिम भागात काल पासून पावसाची संततधार गुरुवारी सायंकाळी पावसाने संततधार सुरू केली ती आजही सकाळ पासून अद्यापही कायम आहे. संथ व संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतीचे वाफे पाण्याने तुंबले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा धुळवाफ पेरण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी भात पिकाची धुळवाफ पेरणी करण्यासाठी जमिनीची मशागत केली होती परंतु पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा जमीनीची मशागत करावी लागणार आहे, अचानकपणे आलेल्या पावसाने ओढ्या नाल्याच्या पाणीपात्रात थोडीसी वाढ झाली आहे. तर राधानगरी ते फेजीवडे या मार्गावर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या तुटल्यामुळे या मार्गावरीळ वाहतूक काही काळ धिम्यागतीने सुरू होती, तर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या विद्युत खांबावर पडूनरात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता.
आज दिवसभर हवेत गारवा आणि धुके होते. अचानकपणे आल्येल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये छत्र्या, रेनकोट, प्लास्टिक कागद खरेदीसाठी स्टॉलवर गर्दी दिसून येत होती. वीट व्यावसायिकांच्या विटा, विटांचे आवे पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे.








