सुधाकर काशीद,प्रतिनिधी
Kolhapur Police News : औरंगजेब टिपू सुलतानच्या स्टेटस वरून कोल्हापुरात हिंसक घटना घडल्या.घटना घडून आठवडा उलटला.काही दंगलखोर पकडले.जामिनावरही सुटले. बाकीच्यांचा शोध सुरू आहे दंगलीचे विश्लेषण वेगवेगळ्या पातळ्यावर सुरू आहे.आता शहर बऱ्यापैकी सुरळीत झाले आहे.पण गेल्या बुधवारपासून शहरातील सात 70 ठिकाणी बंदोबस्तासाठी उभा असलेला पोलीस आजही तेथेच उभा आहे.स्टेटस लावणारे लावून गेले.दगड मारणारे मारून गेले.भाषण करणारे भाषण करून गेले.दंगली नंतर सल्ले देणारे सल्ले देऊन गेले.पण सकाळी नऊ ते रात्री नऊ व रात्री नऊ ते सकाळी नऊ एका ठिकाणी बाकड्यावर बसून आजही पोलीस बंदोबस्त करत आहेत.पोलिसांचे एक खास पथक तर पहाटे चार नंतर सर्व मंदिरे,मशिदी,चर्च ,दर्गे व सर्व पुतळे बारकाईने तपासली जात आहेत. कारण या अशांततेच्या काळात एखादी छोटी घटनाही बघता बघता मोठे गंभीर रूप धारण करेल त्या भीतीचे सावट नक्कीच पोलिसांच्यावर आहे.
पोलिसांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी आहे हे खरे आहे.पण बंदोबस्ताची व दंगल उद्भवण्याची कारणे या बदलत्या काळात बदलली आहेत.एखादा कधी औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर लावेल आणि त्यावरून कोणी पेटून उठेल,दंगल करेल हे तसे कधीच अपेक्षित नव्हते.कारण कोल्हापूरचा सामाजिक इतिहास तसा कधीच नव्हता.पण तसे घडले.बघता बघता तरुणांच्या विविध गटांनी हिंसक वळण दिले.दगडफेकीने जनजीवन विस्कळीत झाले.आणि पोलिसांच्या बंदोबस्ताचे त्या क्षणी वाटप झाले.शहरातील सर्व धार्मिक स्थळासमोर एक दोन किंवा चार पाच या संख्येने पोलीस बंदोबस्तासाठी उभे करण्यात आले .सकाळी नऊ ते रात्री नऊ व रात्री नऊ ते सकाळी नऊ अशी त्यांची बारा बारा तासात बंदोबस्ताची विभागणी करण्यात आली.
प्रत्यक्ष दंगलीच्या दिवसानंतर आजवर पुन्हा काही कटू प्रसंग उद्भवलेला नाही हे खरे आहे.पण बंदोबस्त आजही कायम आहे.छोटी छोटी बाकडी ,प्लास्टिकच्या खुर्च्या, किंवा एखाद्या दुकानाची ऐसपैस पायरी याचा आधार पोलिसांनी बंदोबस्तासाठी बसण्यास घेतला आहे.दुपारचे रात्रीचे जेवण तेथेच कुठेतरी आडोशाला उरकले जात आहे.दिवसाची ड्युटी कशी तरी करता येते.पण रात्रभर एका जागी बसणे मानसिक दृष्ट्या खूप कसोटीचे असते .एखाद्या धार्मिक स्थळावर लांबून जरी काही फेकून मारले तरी ती घटना दंगल पेटवण्यास कारणीभूत ठरू शकते.त्यामुळे रात्री तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवावे लागते.आजूबाजूला एखादी चक्कर मारावी लागते.गस्तीवरील वरिष्ठांची गाडी आली की त्यांना सारी माहिती सांगावी लागते.त्यामुळे अख्खी रात्र डोळ्याला डोळा न लावता पोलिसांना बसून राहावे लागते.
गेले दोन रात्री वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे वाहत होते.पोलिसांनी बंदोबस्त्याच्या ठिकाणीच तात्पुरते आडोसे शोधले. काही पोलीस रात्री थर्मास मधून चहा भरून आणतात. तो दोन-तीन वेळा घेतात.चावतात म्हणून छोटीशी धुनी पेटवून धुर करून डासापासून बचाव करतात.आता पहाटे चार वाजताच पोलिसांचे एक पथक बाहेर पडते. शहरातील प्रत्येक मंदिर ,मशीद, चर्च, दर्गे व पुतळ्यांच्या ठिकाणी जाते. त्यांच्यासोबत स्वच्छतेचे साहित्य असते.पुतळ्यावर देवळावर मशिदीवर काही आक्षेपार्ह पडले असेल तर ते स्वच्छ केले जाते.अगदी बारीकसारीक म्हणजे पुतळ्यांच्या हातातील तलवार,भाले सुस्थितीत आहेत की नाही हे देखील पाहिले जाते.कारण अलीकडे छोटीशी एखादी घटना देखील मोठे गंभीर रूप धारण करू शकते.त्यामुळे शहर जागे होण्यापूर्वी पोलीस असे प्रसंग आपल्या जागरुकतेतुन काळजीपूर्वक हाताळत आहेत.आणि प्रत्येक दंगलीचे खापर ठपोलीस काय करत होते, पोलीस झोपले होते काय?अशा या प्रश्नाने आपल्यावरच फुटणार हे माहीत असूनही पोलीस हे सारे करतच आहेत.









