काँग्रेसचे संपतराव चव्हाण- पाटील, करण शिंदे यांचा माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यावर पलटवारठ
थेटपाईपलाईनवरून चुकीची माहिती देत असल्यावरून आक्रमक
कोल्हापूर प्रतिनिधी
थेटपाईपलाईन संदर्भात माजी नगरसेवक अजित ठाणेकर व्हिडीओ व्हायरल करून चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार पश्चिम ब्लॉक आय काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव चव्हाण-पाटील, सामाजिक कार्यकर्ते करण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अर्धवट माहितीच्या वक्तव्यांना जनता भिक घालणार नाही. पुन्हा बिनबुडाचे आरोप केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
करण शिंदे म्हणाले, पंचगंगेतील पाणी अशुद्ध असल्यानेच आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे या हेतूने काळम्मावाडीतून थेट पाईपलाईन योजना मंजूर करुन आणली. ही योजना 4 ते 5 वर्षात पूर्ण होईल. या हेतूने काम सुरू केले. परंतू 2014 मध्ये सत्ता बदल झाल्यानंतर योजनांच्या शासकीय परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण करुन ही योजना चालूच होणार नाही, यासाठी कुबुध्दीने सातत्याने प्रयत्न केले. मुळात या योजनेसाठी 4 पंप असून त्यापैकी 1 पंप राखीव असून 2 पंप चालू करुन त्यांची क्षमता बघून 3 रा पंप चालू केला जाणार आहे. याची माहिती माजी नगरसेवक ठाणेकर यांना नाही.
गेली 40 वर्षे ज्या प्रकल्पाची कोल्हापूरची जनता वाट पहात होती आणि त्याची पूर्तता आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून होत आहे. याचीच पोटदुखी विरोधकांना आहे. त्यामुळेच ते अशी वाचाळ वक्तव्ये करत आहेत. अजित ठाणेकर यांनी पाच वर्षाच्या नगरसेवक कार्यकाळात स्वत:च्या प्रभागात सुरळीत सुरु असणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, याची प्रथम माहिती द्यावी. ज्या नगरसेवकाच्या प्रभागात ‘नगरसेवक हरवला आहे‘ असे बोर्ड लागले, अशेंना थेटपाईपलाईनवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. यावेळी संग्राम गायकवाड, अरूण साळोखे, राहूल पाटील, सचिन साबनुरे आदी, उपस्थित होते.









