Sanjay Pawar News : शिंदे गटातील गद्दार लोक असलेल्या आघाडीमध्ये सहभागी होणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत पराभव झाला तरी चालेल पण, गद्दार गट असलेल्या आघाडी सोबत कोणतेही निवडणूक लढवणार नाही.त्यामुळे शिवसेना ठाकरे गट सत्ताधारी आणि विरोधी पॅनेल मधून बाहेर पडल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार द्वारे दिली.
काय म्हटलय़ं पत्रकात
राजकारणामध्ये युती आघाडी या नेहमीच होत असतात. मात्र सत्तेसाठी दलबदलूपणा हा दुर्देवी आहेच तो ही राजकारणाचा भाग आहे.पण, उद्धवजींसारख्या संयमी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीशी खंजीर खुपसून सत्ता व लोभी भाजपशी युती करणाऱ्या शिंदे गटाबरोबर कुठल्याही निवडणुकीमध्ये समझोता हा कदापि मान्य होणार नाही. काल बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये तयार केलेले आणि शिंदे गटाच्या मदतीने झालेले पॅनेल हे आम्हाला मान्य नसून शिंदे गटाशी कुठलीही आणि कदाही सोयरीक आयुष्यामध्ये भविष्यात कुठल्याही राजकारणात शक्य होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन संजय पवार यांनी करून बाजार समितीमध्ये मांडलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधातल्या पॅनलला शिंदे गटाच्या उपस्थितीला विरोध
केला.
हिंदुत्वाचा वसा आणि वारसा घेत प्रत्येक ठिकाणी उद्धवजींची व आदित्यजींची अवहेलना करणाऱ्या शिंदे गटाला आणि उध्दवजीची ऐकेरी वर्तणूक करून उद्धवजींना अत्यंत अपमानास्पद रित्यारून पायउतार करून आजही सत्तेची स्थान उरमटपणाने भोगत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला वाईट दिवस दाखवणाऱ्या या शिंदे गटांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या बरोबर कुठल्या प्रकारची युती व आघाडी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मला मान्य नाही.

राजकारणामध्ये मतमतांतर असू शकतात परंतु सत्तेच्या कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचं यश दृष्टीक्षेपात असलं तरीसुद्धा शिंदेंच्या गटाबरोबर कधीही कुठल्याही प्रकारची युती कोल्हापूरात केली जाणार नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. उद्याच्या होणाऱ्या बाजार समितीमध्ये भले अपयश पदरी आलं तरी अडचण नाही परंतु शिंदे गटाशी कुठलीही युती कधीही होणार नाही ,असे स्पष्ट शब्दात पवार यांनी म्हटलयं.
महाविकास आघाडीच्या कोणतीही आघाडी करताना आता होणाऱ्या शिवसेनेची नैसर्गिक आणि राज्यातली युती लक्षात घेता शिवसेनेची सन्मानाने वागणूक सातत्याने ठेवावी कोल्हापुरातल्या सर्वच मतदारसंघांमध्ये निकाल पालटवण्याची ही शिवसेनेकडे क्षमता आहे, हेही महाविकास आघाडीने लक्षात ठेवावे. महाविकास आघाडीने दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या अवस्थेमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्याशी कुठल्याही परिस्थितीत स्थान मिळणार नाही आणि ज्या ठिकाणी शिंदे गट असेल अशी कुठलीही युती आम्हाला करणार नाही. उद्याच्या राजकारणामध्ये शिंदे गटाला प्रत्येक ठिकाणी पद्धतशीरपणे चितपट करून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून नामोहरण करणे हेच आमचं उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही संजय पवार दिला.









