संतोष पाटील,कोल्हापूर प्रतिनिधी
Kolhapur Market Committee Election : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीला शिंदे गट-ठाकरे गट शिवसेना आणि भाजपसह घटक पक्षांनी राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात पक्षीय परिघाबाहेर आघाड्या होत आहेत. राजकारण आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका वेगळ्या असल्याचे सांगत सोईच्या राजकारणाची नांदी बाजार समितीच्या रणांगणात पुन्हा प्रकर्षाने पुढे येत आहे. शिंदे गट-शिवसेना एकाबाजूला आणि त्यातील प्रमुख शिलेदार दुसऱ्या बाजूला आहेत, तर कुंभी आणि राजाराम कारखान्यात वेगळ्या दिशेला असलेल्या काँग्रेस नेत्यांची बाजार समितीच्या निमित्ताने समझोता एक्सप्रेस धावत आहे. कथीत भ्रष्ट कारभारावरुन बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाला राजीनामा देणे भाग पाडलेल्या भाजपचे कोरे-मंडलिक यांच्या साथीने तगडे आव्हान देण्याच्या प्रयत्नाला मात्र तडा गेला.
वडगाव बाजार समितीच्या डिसेंबर 2021 च्या निवडणुकीत कोरे-महाडिक-आवाडे-शेट्टी-यड्रावकर-हाळवकर हे गट राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत एकत्र आले होते. जिह्याचे राजकारण तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या एककेंद्री सत्तेच्या बाजूने झुकत असतानाच बाजार समितीच्या निमित्ताने घटक पक्षांनी एकत्र येत राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे संकेत देण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत तो यशस्वी करुन दाखवला होता. भाजपच्या झेंड्याखाली राज्यातील सत्तेत सहभागी नेते बाजार समिती निवडणुकीत एकत्र येतील ही आश मात्र यावेळी मावळली.

आता राजाराम साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षपणे काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचे शिलेदार राजारामच्या रणांगणात व्यस्त असल्याने तुलनेत दोन्ही गटाचे बाजार समितीच्या निवडणुकीकडे तितके लक्ष नाही. सुरू असलेल्या राजाराम कारखाना निवडणुकीत उघड आणि पडद्यामागे जुळून आलेली राजकीय समिकरणे बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र वेगळ्या मार्गावर असल्याचे दिसते. आमदार विनय कोरे यांनी बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी-जनुसराज्य पक्ष ही आघाडी कायम ठेवली आहे. ठाकरे गटाला एक जागा दिली असली तरी त्या जागेवरील उमेदवार आ. हसन मुश्रीफ यांनीच ठरवल्याचे ठाकरे गट अवस्थ आहे. शिंदे गटाचे खा. संजय मंडलिक आणि आ. प्रकाश आबिटकर हे दोघे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आहेत.
बाजार समितीची 2015ची निवडणूक तिरंगी झाली होती. आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे यांची एक आघाडी तर दुस्रया बाजूला आ. पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांची आघाडी तसेच खा. संजय मंडलिक, चंद्रदीप नरके, राजू शेट्टी, भाजप मित्रपक्ष यांची तिसरी आघाडी असा तिरंगी सामना झाला होता. त्यात मुश्रीफ-कोरे आणि सतेज पाटील आघाडीने 19 पैकी 16 जागा जिंकत बाजी मारली होती. राज्यातील सत्ताबदलाचे परिणाम म्हणून आ. विनय कोरे आणि खा. संजय मंडलिक यांच्या साथीने भाजप तगडे आव्हान देईल, भाजप-शिंदे गट शिवसेना मित्रपक्ष आघाडी भक्कम असल्याचे संकेत बाजार समितीच्या राजकारणातून देण्याचे शक्यता होती. याचे प्रतिध्वनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकत उमठतील ही तूर्त चर्चा ठरली. कोरे आणि मंडलिक यांनी दोन्ही काँग्रेसला साथ दिल्याने विरोधी आघाडीच्या कथीत व्युहरचनेला तडा गेला.
गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या राजकारणाप्रमाणेच बाजार समितीच्या राजकारणात विनय कोरे आणि संजय मंडलिक यांना आपल्या सोबत ठेवण्यात आ. हसन मुश्रीफ आणि आ. सतेज पाटील यांना यश आले. जिल्हा बँक निवडणुकीचा पॅटर्न बाजार समितीची रणनिती ठरवता आखला गेला. संजय मंडलिक सोबत राहतील याची काळजी दोन्ही काँग्रेसने घेतली. भाजपला बळ मिळ नये, यासाठी खा. संजय मंडलिक आणि आ. विनय कोरे आपल्यासोबत राहतील, ही खेळी यशस्वी करण्यात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना यश आले. आ. पी.एन. पाटील यांना सोबत घेत काँग्रेसमधील फुट टाळण्यात यावेळी यश आले. कोरे-मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल करण्याचा प्रयत्न अशस्वी झाल्याने आता खा. धनंजय महाडिक, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राजू शेट्टी, समरजीत घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरुडकर, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, पी. जी. शिंदे आदींना एकत्रित करत मुश्रीफ-कोरे-पाटील-मंडलिक आघाडीपुढे तगडे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे. याव्यतिरिक्त तिसरी आघाडी रिंगणात असेल.
व्यासपीठ आणि चेहरे बदलले
दोन्ही काँग्रेस जिह्याच्या राजकारणात शिवसेनेला विश्वासात घेत नाहीत, हा आरोप महाविकास आघाडी शासन काळात कळीचा मुद्दा होता. बाजार समितीमध्ये ठाकरे गटाला एक जागा दिली, मात्र उमेदवार निवडीचा अधिकार हसन मुश्रीफ यांनी आपल्याकडे ठेवल्याचे आरोप ठाकरे गटाच्या शिलेदारांचा आहे. जिह्यात काल आणि आजपण ठाकरे गटाला गृहीत धरुनच दोन्ही काँग्रेसचे राजकारण सुरू असल्याची खदखद आहे. राज्याच्या राजकारणात कोरे आणि मंडलिक भाजपसोबत आहेत. मात्र संस्था निवडणुकीत वेगळी भूमीका आहे. राजाराम कारखाना निवडणुकीत महाडिक गटाला कोरे यांनी पाठींबा दिला आहे. तर सतेज पाटील गटाच्या प्रचारात संजय मंडलिक आणि चंद्रदीप नरके यांचे कार्यकर्ते आहेत. मागील महिन्यात कुंभी कारखान्यात सतेज पाटील-पी.एन पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकाविरोधात उभे ठाकले होते. कुंभी आणि राजारामच्या निवडणुकीनंतर बाजार समितीत नेत्यांची भूमीका बदलल्याचे दिसते. संस्था निवडणुकीतील राजकीय घुसळण ही पक्षीय परिघाबाहेर मित्रत्व आणि उट्टे काढण्याच्या निमित्ताने होत असल्यानेच व्यासपीठावरील चेहरे हे संस्थापरत्वे बदलताना दिसतात.
असे आहेत मतदार
तालुका संस्था सदस्य ग्रामपंचायत सदस्य
करवीर 2,844 1,314
राधानगरी 2,144 895
भुदरगड 2,207 790
शाहूवाडी 1082 921
पन्हाळा 2,734 1024
कागल 1,199 452
गगनबावडा 661 237
एकूण 12,871 5,633
अडते व व्यापारी 1,188
हमाल तोलाईदार 743
अशा आहेत 18 जागा
विकास संस्था सदस्य एकूण – 11 ( पैकी 7 सर्वसाधारण, दोन महिला, इतर मागास आणि भटक्या विमुक्त जाती प्रत्येकी एक) ग्रामपंचायत सदस्यामधून 4 (पैकी दोन सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि आर्थिक दुर्बल प्रत्येकी एक) तसेच व्यापारी आणि आडेत दोन तर हमाल-तोलाईदार एक अशा 18 जागावर ही लढत होत आहे.









