जिह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले मार्गदर्शन; दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिह्यातील दोन्ही विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचेच असल्याने आगामी लोकसभा निवडणूकीत या दोघांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असून त्यांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी आतापासून कामाला लागा असे आवाहन शिंदे गट शिवसेनेचे नुतन संपर्कप्रमुख, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केले. मंगळवारी रात्री त्यांनी जिह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन केले.
शिवतारे म्हणाले, शिवसेनेतील यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. बाळासाहेब ठाकरे यांची एक अशी यंत्रणा होती की त्यातून सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यालाही न्याय मिळत होता. परंतू परिस्थिती बदलत गेली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून आम्ही दूर जावू लागलो. परिणामी एकनाथ शिंदे यांना वेगळा विचार करावा लागला. सर्वसामान्य माणूस, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्याशी नाळ जुळलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच आता ते मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर आपण पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पाहिजेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना शिवतारे म्हणाले, आतापर्यंत कोल्हापूर जिह्यात शिंदे गटाने लोकसभा, विधानसभेत यश मिळवले आहे. परंतू आता त्याच्याही पुढे जाण्याचे आम्ही नियोजन करत आहोत. लोकसभेच्या दोन्ही जागा चांगल्या मताधिक्याने जिंकणे, शिवसेनेचे जिह्यात यापूर्वी सहा आमदार होते. आता पुन्हा सहा आमदार निवडून आणणे, जिल्हा परिषदेचे सध्या असलेले सदस्य वगळता आणखी 20 सदस्य निवडून आणणे आणि विद्यमान पंचायत समिती सदस्यांपेक्षा 40 जादा सदस्य निवडून आणायचे हे आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे केवळ नेत्यांसोबत फिरत बसू नका. तर गावागावात सामान्यांची कामे करा, रोज त्यांच्या संपर्कात रहा. आधी गल्ली, मग गाव, मग पंचक्रोशी आणि मग तालुका बळकट करा. जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रविंद्र माने यांनी शिवतारे यांचे स्वागत केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, रणजित मंडलिक, युवा सेनेचे निशिकांत पाटील, संदीप ढेरे, इचलकरंजी शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे, शहरप्रमुख रूपाली चव्हाण, वैशाली डोंगरे, अजित सुतार, सुधीर पाटोळे, विनयकुमार स्वामी, संजय संकपाळ, विनय बलुगडे, अरूण जाधव, राहूल पाटील, महेश घाटगे आदी उपस्थित होते.
गटबाजीतून कुरघोड्या नको
एखाद्यावर आरोप करण्याच्या उद्देशाने कोणाचीही निंदानालस्ती करू नका. परंतू आपल्या नेत्यांवर टीका केली तर मात्र कोणालाही सोडू नका. आपल्याला सर्वांना सोबत घेवून जाण्याची गरज आहे. येथे गटबाजी खूपच होती. अगदी चप्पल फेकीपर्यंत सर्व प्रकार झाले आहेत. परंतू आता परिस्थिती बदलली आहे. आपल्याआपल्यात गटबाजी आणि कुरघोड्या करू नका, असाही सल्ला शिवतारे यांनी कार्यकर्त्यांना दिला.