नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यापूर्ण कामाअंतर्गत विशेष अनुदान
मुरगूड / वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महानगरपालिका व नगरपरिषदांनाक वैशिष्ट्यापूर्ण कामासाठी विशेष अनुदानातून दहा कोटी रुपये मंजूर झाले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना तातडीने मंजुरी दिल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकाद्वारे दिली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर महानगरपालिका, कागल नगरपरिषद, मुरगुड नगरपरिषद ,गडहिंग्लज नगर परिषद व चंदगड नगरपंचायत यांचा समावेश होतो. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यापूर्ण योजने अंतर्गत साडेपाच कोटी रुपये निधी मंजूर झाले आहेत. मुरगुड नगरपालिकेसाठी दोन कोटी 65 लाख ,गडहिंग्लज नगरपालिकेसाठी एक कोटी दहा लाख ,कागल नगर परिषदेसाठी वीस लाख तर चंदगड नगरपंचायतीसाठी 50 लाख असे एकूण चार कोटी 45 लाख रुपये वैशिष्ट्यापूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून मिळाले आहेत. कोल्हापूर शहरासाठी साडेपाच कोटी व उर्वरित नगरपालिकांसाठी चार कोटी 45 लाख असा एकूण दहा कोटी रुपयांचा निधी आपल्या प्रयत्नातून व मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे मंजूर झाल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
मंजूर निधी पैकी साडेपाच कोटी रुपये कोल्हापूर महापालिकेने सुचविलेल्या विविध विकास कामांसाठी खर्च होणार आहेत. असे सांगून खासदार मंडलिक म्हणाले, मुरगूड नगर परिषदेला मिळालेल्या दोन कोटी 65 लाख रुपयांच्या रकमेतून नगरपालिका हद्दीत इनडोअर स्टेडियम बांधणे (2.5 कोटी), महालक्ष्मी नगर येथील तालमी समोरचा परिसर विकसित करणे व ओपन जिम (15 लाख) यासाठी खर्च होणार आहे.
गडहिंग्लज नगर परिषदेसाठी एक कोटी दहा लाखाचा निधी मंजूर झाला असून पालिका हद्दीत अंतर्गत रस्ते ,सौर हायमास्ट ,मार्केट यार्ड चौक ,नदीवेस हनुमान मंदिर परिसर , भगवा चौक व आयोद्यानगर चौक सुशोभीकरणासह गडहिंग्लज कला अकादमीसाठी प्रोजेक्टर स्किम आणि साऊंड बसवणे या विकास कामांचा समावेश आहे.
कागल नगरपालिकेला मंजूर झालेल्या वीस लाख रुपयांच्या निधीतून मुजुमदार कॉलनी येथे अंतर्गत रस्ते ,गटर्स, सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत, भक्तनिवास बांधणे व सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे. चंदगड नगरपंचायतीला 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून सौर हायमास्ट व एलईडी दिवे (15 लाख),छत्रपती संभाजी चौकातील पिकअप शेड विस्तारीकरण (10लाख) व वसंत नदी घाट नूतनीकरण ,सुशोभीकरण व डागडुजी (25लाख) या कामांचा समावेश आहे.









