Narsinhwadi : गेल्या चार दिवसापासून पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. त्यामुळे सर्वच नद्यांची पाणी पातळी संथ गतीने कमी होऊ लागली आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरातील पाणी हळूहळू ओसरू लागल्याने उद्या शुक्रवार (दि- 19) ऑगस्ट रोजी दक्षिणद्वार होण्याची शक्यता आहे.
कोयना, राधानगरी धरणातून कमी झालेला पाण्याचा विसर्ग यामुळे तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पुराच्या पाण्यामुळे बंद झालेले नांदणी- कुरुंदवाड, हेरवाड-अब्दुल लाट हे मार्ग खुले झाले आहेत. तर कुरुंदवाड-शिरढोण दरम्यानचा पंचगंगा नदीवरील शिरढोण पूल अद्याप पाण्याखाली आहे. त्याचबरोबर तालुक्यातील तेरवाड, शिरोळ, राजापूर बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. दरम्यान शुक्रवारी सायंकाळपर्यंत कुरुंदवाड- शिरढोण मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापूरस्थिती झपाट्याने निर्माण होते. मात्र पूर ओसरत असताना संथगतीने का ओसरतो याबाबत पूरग्रस्त नागरिकात विविध प्रश्न निर्माण झाले असून नेमके याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी, प्रशासन की निसर्ग? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. यावरही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत आत्तापर्यंत आलेल्या कोणत्याच सरकारने ठोस उपाययोजना केली नाही. केवळ महापुरावर कायमचा तोडगा काढू अशी केवळ आश्वासन देण्यात आली आहेत. त्यामुळे आतातरी पुरस्थितीवर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Previous Articleकोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट
Next Article ‘सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली’ला राष्ट्रीय पुरस्कार









