कसबा बीड वार्ताहर
कुंभी- कासारी परिसरात पाडळी खुर्द, कोगे, कसबा बीड, सावरवाडी, शिरोली दुमाला आदी भागात शेतकऱ्यांनी ऊस आंदोलन हाती घेतलं असून या परिसरातील आज अखेर एकही ऊसतोड घेतली नाही. उसदराचा तिढा अजूनही सुटला नसल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदणी झालेल्या ऊस तोडण्य़ा परत पाठवल्या आहेत.
गेली अनेक दिवस सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागील 400 रु. मागणी आंदोलन व एफआरपी वाढून मिळावी, यासाठी जवळपास 550 किलोमीटर प्रवास करीत शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आंदोलन चालू ठेवले. या महिन्यात 7 तारखेला राजू शेट्टी यांनी दिवाळीमध्ये सर्व कारखानदारांना खर्डा भाकरी खाऊ देणार असे सांगितले व करूनही दाखवले.तर आता त्यांनी यावर्षी 3500 एफआरपी व मागील वर्षीचे 400 रूपये द्यायलाच पाहिजे म्हणून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच यावर्षी काही शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी न करता या आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा दिला असताना सुद्धा यावर निर्णय व तोडगा अजून निघाला नाही.
पण काही कारखानदारांनी पोलीस यंत्रणेची सुरक्षा घेऊन ऊस तोडी चालू केल्या आहेत. त्यामुळे काही भागात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकऱ्यांकडून अडवून ऊस वाहतूक बंद केली. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीकडे राज्यसरकार आणि साखर कारखानदार लक्ष देत नाहीत असा आरोप करून वाहने पेटवण्यात आली आहे.
कुंभी- कासारी साखर कारखाना परिसर व करवीर पश्चिम भाग येथे शेतकऱ्यांनीच आंदोलन आपल्या हाती घेतले आहे. साखर कारखाना यांच्याकडून ऊस- तोडी देऊन सुद्धा वाहनधारक व शेतकऱ्यांनी ऊसतोड घेतलेली नाहीत. भागातील सर्व शेतकऱ्यांनी ऊस आंदोलन सर्व शेतकऱ्यांचेच आहे जाणवून दिले. याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुंभी परिसर अध्यक्ष बाजीराव देवाळकर, मुकंदराव पाटील कसबा बीड, पांडुरंग शिंदे बाजीराव पाटील दोनवडे, दगडू गुरुवळ खोतवाडी, रंगराव पाटील कोपार्डे सुनील कापडे, पोपट मडगे, विकास देसाई सांगरूळ. कुंडलिक केबळेकर, अर्जुन पाटील, बाळू कोठावळे,धनाजी बोरगे पडळकर शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला शेतकरी वर्गाने पाठिंबा दिला आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोड घेऊ नये असे आवाहन केले आहे.