धरणक्षेत्रात जोरदार,नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
कोल्हापूर / प्रतिनिधी
जिह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर रविवारी कायम राहिला. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यात गेल्या चोविस तासांत 97.4 मिमी पाऊस झाला असून पंचगंगेची पाणीपातळी 20.6 फुटांपर्यंत पोहोचली आहे. जिह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जोरदार पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे. राधानगरी धरणातून 1600 क्युसेक जल विसर्ग सुरु आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिह्याच्या धरणक्षेत्रात जोरदार र्पास सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सुमारे पंधरा दिवसांची उघडीप दिल्यानंतर सुरु झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
जिह्यात एकूण 31.8 मि.मी. पाऊस
जिह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 97.4 मि.मी पाऊस झाला असून हातकणंगले 10.5, शिरोळ 6.6, पन्हाळा 19.7, शाहूवाडी 42.2, राधानगरी 51.7 , गगनबावडा 97.4, करवीर 19.3, कागल 26.2, गडहिंग्लज 30.1, भुदरगड 61.9, आजरा 46.3, चंदगड- 48.5, असा एकूण 31.8 मिमी पावसाची नोंद आहे.
काळम्मावाडीतून विसर्ग सुरु
दूधगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सरवडे प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथील राजर्षी शाहू धरणात 79.18 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. गेले तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाटय़ाने वाढली आहे. धरणाची पाणी साठा क्षमता 25. 40 टी.एम.सी. ईतकी असल्याने धरण भरण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. मात्र पुढील दक्षतेसाठी धरणाच्या वक्राकार दरवाजातून 425 क्युसेक व जल विद्युत केंद्रातून 1000 क्युसेक असा 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात सुरू केला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कागल तालुक्यात दमदार
वेदगंगा- दूधगंगा पात्राबाहेर : चिकोत्रेच्या पातळीत वाढ
सेनापती कापशी प्रतिनिधी
वेदगंगा, दुधगंगा या दोन्ही नद्या पात्राबाहेर पडल्या असून चिकोत्रा नदीही दुथडी वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठावरील पिके पाण्याखाली जात आहेत. गेले चार दिवस जोराचा पाऊस सुरू झाला आहे. कागल तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे. वेदगंगा नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पण आणूर-बस्तवडे दरम्यान वेदगंगेवर नवीन झालेल्या पुलामुळे वाहतूक मात्र सुरळीत आहे. चिकोत्रा धरणही भरण्याच्या अंतिम टप्प्यात असून सकाळपासून वीज केंद्रातून 100 क्यूसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
ऐनापूर, निलजी, बंधाऱयावर पाणी
गडहिंग्लज प्रतिनिधी
आज सोमवारी पुन्हा पावसाने गडहिंग्लज तालुक्याला झोडपून काढले. जोराच्या पावसाने हिरण्यकेशी, घटप्रभा नद्या पात्राच्या बाहेर पडल्या असून हिरण्यकेशीवरील ऐनापूर आणि निलजी बंधाऱयावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. गेले चार दिवस गडहिंग्लज तालुक्यात जोराचा पाऊस होत असून या पावसाने नरेवाडी, तेरणी येथील तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. ऐनापूर बंधाऱयावर पाणी आल्याने कोवाडे, सरोळी, निंगुडगे, पेद्रेवाडी या गावांना जाणारी वाहतूक पर्यायी मार्गे वळवण्यात आली आहे. निलजी बंधाऱयावर पाणी आल्याने निलजी नूलमार्गे होणारी वाहतूक जरळी बंधाऱयावरुन वळवण्यात आली आहे.
हलकर्णी परिसरात जोरदार पाऊस
हलकर्णी परिसरातही जोराचा पाऊस सुरु आहे. हिरण्यकेशीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नांगनूर ते संकेश्वर दरम्यान हनुमान मंदिराशेजारी असणाऱ्या बंधाऱ्यावर सोमवारी दुपारी पाणी आल्याने या बंधाऱ्यावरील वाहतूक थांबवली आहे.
गगनबावडय़ात अतिवृष्टी, कळे-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद
गगनबावडा प्रतिनिधी
चार दिवसापासून गगनबावडा तालुक्यात पाऊस सुरु आहे. सोमवारी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून कुंभी नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान कोल्हापूर-गगनबावडा या प्रमुख मार्गावर मांडुकली पैकी पडवळवाडी येथे रस्ता पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन प्रशासनाने कळे ते गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. गेल्या 24 तासात कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 310 मिलिमीटर तर कोदे धरणक्षेत्रात 207 मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावडा परिसरात 192 मिलिमीटर तर साळवण परिसरात 180 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प 82.66 टक्के भरला आहे. धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने कुंभी धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणेसाठी आज दुपारनंतर धरणाच्या तीन वक्राकार दरवाज्यातून 600 क्युसेक्स तर विद्युत निर्मितीसाठी 300 क्युसेक्स असा एकूण 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरु आहे. कोदे लघु प्रकल्पाच्या सांडव्यावरून 1320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सरस्वती नदीपात्रात होत आहे. सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिला तर आज रात्री तिसंगी पैकी टेकवाडीस वेढा पडण्याची शक्यता आहे.
आजरा तालुक्यात अतिवृष्टी, चित्रीत 98 टक्के साठा
आजरा प्रतिनिधी
आजरा तालुक्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात सरासरी 83.50 मि. मि. इतका पाऊस झाला. साळगांव बंधारा सलग दुसऱया दिवशीही पाण्याखाली गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाली आहे तर चित्री धरणक्षेत्रामध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे.
बाजारभोगाव- अणुस्करा- राजापूर हा राज्यमार्ग बंद
बाजारभोगाव / वार्ताहर
कासारी व जांभळी खोयात गेले दोन दिवस जोरदार वाऱयासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जांभळी व कासारी नदीस पुर आला आहे. या पुरामुळे बाजारभोगाव ते पोहाळे तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) दरम्यान असणाया मोडक्या वडाजवळील मोरीवर सोमवारी कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर- बाजारभोगाव – अणुस्करा- राजापूर हा राज्यमार्ग यावर्षी बंद झाला आहे. त्यामुळे पोहाळे तर्फ बोरगाव – पोहाळवाडी या पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू होती. मुसळधार पावसामुळे 83 टक्के कासारी मध्यम प्रकल्प भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून 1090 क्युसेक प्रति सेकंद दराने विसर्ग सूरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे सचिन माने यानी दिली आहे.
भुदरगड चार बंधारे पाण्याखाली
गारगोटी प्रतिनिधी
गेली तीन दिवस भुदरगड तालुक्यात संततधार पाऊस सुरू असुन वेदगंगेचे पाणी तिस्रयांदा पात्राबाहेर पडले आहे.तर तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.पावसाचे सातत्य कायम असुन धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. वेदगंगा नदीवरील आकुर्डे, म्हसवे, निळपण, वाघापूर असे चार कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले असून या परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत बनली आहे.